Shivdeep Lande Resigns : बिहार केडरचे डॅशिंग पोलिस अधिकारी शिवदीप वामनराव लांडे यांनी (Shivdeep Lande Resigns) आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. शिवदीप लांडे यांची नुकतीच पूर्णिया रेंजचे आयजी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राजीनामा दिल्यानंतर स्वतः शिवदीप लांडे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. आयपीएस शिवदीप लांडे माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई असून त्यांनी महाराष्ट्रात सुद्धा कर्तव्य बजावले आहे.


राजीनाम्यानंतर काय म्हणाले शिवदीप लांडे? 


शिवदीप लांडे म्हणाले की, 'माझ्या प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदावर काम केल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा वरचढ मानले आहे. सरकारी कर्मचारी असताना माझ्या कार्यकाळात काही चूक झाली असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. आज मी भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) राजीनामा दिला आहे, पण मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार हेच माझे कार्यस्थान राहील. 




बिहार आणि महाराष्ट्र कर्मभूमी


शिवदीप लांडे हे बिहार केडरचे आयपीएस अधिकारी असले तरी त्यांची नियुक्ती महाराष्ट्रातही झाली आहे. शिवदीप लांडे यांची बिहारमध्ये एसटीएफचे एसपी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांची बदली महाराष्ट्र केडरमध्ये करण्यात आली. बिहारला परत येईपर्यंत ते महाराष्ट्र एटीएसमध्ये डीआयजी पदापर्यंत पोहोचले होते.


शिवदीप लांडेंच्या सहा शब्दांनी भूवया उंचावल्या!


शिवदीप लांडे यांनी राजीनाम्यामागे कारण सांगितलं नसलं, तरी मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार हेच माझे कार्यस्थान राहील या एका वक्तव्याने राजकीय भूवया मात्र उंचावल्या गेल्या आहेत. मात्र, शिवदीप लांडे यांच्याकडून यावर अद्याप कोणतीही थेट प्रतिक्रिया आलेली नाही. एबीपी न्यूजने शिवदीप लांडे यांच्याशी फोनवर चर्चा केली असता त्यांनी उघडपणे काहीही सांगितले नाही. शिवदीप लांडे यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, मी सेवेतून राजीनामा दिला आहे, पण पुढे काय करायचे ते ठरवलं नाही. शिवदीप लांडे हे शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय श्रीगणेशाची सुद्धा चर्चा रंगली आहे. 


प्रशांत किशोर यांच्या पक्षात सामील होणार? 


शिवदीप लांडे यांनी भविष्यातील वाटचालीवर भाष्य केलं नसलं, तरी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जन सूराजमध्ये सामील होण्याबाबतही अंदाज व्यक्त होत आहे. 2 ऑक्टोबर रोजी अभियान पथक म्हणून तयार होणार आहे. यामध्ये अनेक निवृत्त आयएएस आणि आयपीएस अधिकारी सामील झाले आहेत. विशेष म्हणजे अलीकडेच माजी आयपीएस आनंद मिश्राही जन सूराजमध्ये सामील झाले आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूकही अपक्ष म्हणून लढवली होती, पण पराभूत झाले होते. 


बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये एसपी


शिवदीप लांडे जन सूराजमध्ये सहभागी झाले तर त्यांना बिहार विधानसभा निवडणुकीत संधी मिळू शकते. त्याचं कारण म्हणजे पटनामध्ये असताना त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. बिहारमधील इतर अनेक जिल्ह्यांमध्ये ते एसपीही राहिले आहेत. बिहारमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. बिहार पोलिस दलात त्यांची सिंघम म्हणून ओळख आहे. त्यामुळे आजवर कमावलेल्या ओळखीच्या जोरावर शिवदीप लांडे  बिहारच्या राजकीय पटलावर दिसून आल्यास आश्चर्य वाटणार नाही. 


शिवदीप लांडे हे सध्या पूर्णिया रेंजचे आयजी म्हणून तैनात होते. दोन आठवड्यांपूर्वी त्यांची पूर्णिया रेंजचे आयजी म्हणुन नियुक्ती करण्यात आली होती. याआधी ते तिरहुत रेंजचे आयजी होते. गुन्हेगारांविरुद्ध त्यांची नेहमीच कठोर भूमिका राहिली. लांडे हे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीआयजी म्हणून काम केले आहे.


मुंगेर जिल्ह्यात शिवदीप लांडेंची पहिल्यांदा पोस्टिंग


शिवदीप लांडे यांची बिहारमध्ये प्रथम नक्षलग्रस्त मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर येथे नियुक्ती करण्यात आली होती. ते एएसपी म्हणून रुजू झाले होते. जवळपास दोन वर्षे इथे पोस्टिंग होते. यानंतर ते पाटणा येथे सिटी एसपी म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या गुन्हेगारांविरुद्धच्या कारवाईची पाटण्यात खूप चर्चा झाली.


इतर महत्वाच्या बातम्या