मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफचा 2015-16 या आर्थिक वर्षाचा व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. 31 मार्च 2015 रोजी संपलेल्या 2015-16 या आर्थिक वर्षात पीएफ खाते धारकांना 8.7 टक्के एवढा व्याजदर मिळणार आहे. केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी ही माहिती दिली. यापूर्वी पीएफवरील व्याजदर 8.75 टक्के होता.






कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे देशभरात जवळपास 4 कोटी सभासद असल्याचं सांगितलं जातं. बिगर सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील संघटित कर्मचाऱ्यांच्या पगारातील ठराविक भाग ईपीएफमध्ये जमा होतो. तेवढाच निधी मालकांच्या वतीने ईपीएफकडे जमा केला जातो. या एकूण जमा होणाऱ्या रकमेवर दरवर्षी किती व्याज द्यायचं याचा निर्णय ईपीएफ विश्वस्तांच्या बैठकीत घेतला जातो. विश्वस्तांच्या निर्णयावर केंद्रीय अर्थमंत्रालय शिक्कामोर्तब करतं. त्यानुसार 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी 8.7 टक्के व्याज दर मिळणार आहे.




केंद्र सरकारने अलीकडेच वेगवेगळ्या अल्पबचन योजनांसह अनेक सरकारी गुंतवणूक योजनांच्या व्याजदरात कपात केलीय. त्याप्रमाणेच ईपीएफच्या व्याजदरात अल्पशी कपात करण्यात आलीय. तरीही अन्य अल्पबचत गुंतवणूक पर्यायाच्या तुलनेत ईपीएफचे व्याजदर आकर्षक असल्याचं जाणकार सांगतात.




सरकारी अल्पबचत योजनांमध्ये आधी सर्वाधिक व्याज मिळायचं ज्येष्ठ नागरिक बचत योजनेला.. यासाठी आधी 9.3 टक्के दराने व्याजआकारणी व्हायची, आता त्यामध्ये कपात करून हा दर 8.6 टक्के करण्यात आला, नरेंद्री मोदी यांनी जाहीर केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेसाठीही आधी 9.2 टक्के व्याजदर होता, तोही आता 8.6 टक्के करण्यात आलाय. पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदरही 8.7 टक्क्यांवरून 8.1 टक्के करण्यात आला. त्यातुलनेत ईपीएफच्या व्याजदरात कपात केल्यानंतरही नवे व्याजदर 8.7 टक्के म्हणजे सरकारी बचत आणि गुंतवणूक योजनेत सर्वाधित असणार आहेत. ​