नोटांवर सही करणाऱ्या अधिकाऱ्याचा पगार किती?
एबीपी माझा वेब टीम | 25 Apr 2016 07:13 AM (IST)
नवी दिल्ली : भारतीय चलनी नोटांवर सही असलेल्या व्यक्तीला म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना किती पगार असेल, याबाबतची उत्सुकता सर्वांनाच असेल. मात्र रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हेच केवळ सर्वाधिक पगार घेणारे अधिकारी नाहीत. तर यांच्यापेक्षाही अधिक पगार घेणारे अधिकारी आहेत. रिझर्व्ह बँकेकडून माहिती अधिकाराअंतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीमध्ये याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. रघुराम राजन यांचा मासिक पगार 1 लाख 98 हजार 700 रुपये आहे. यामध्ये 90 हजार रुपयांचं मूळ वेतन, 1 लाख 1 हजार 700 रुपये महागाई भत्ता आणि सात हजार रुपये 'इतर' असं पगाराचं स्वरुप आहे. रिझर्व्ह बँकेकडून आपल्या कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतन भत्त्यांची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार राजन यांच्यापेक्षा तीन अन्य अधिकाऱ्यांना अधिक पगार आहे. या तीन अधिकाऱ्यांमध्ये गोपालकृष्ण सीताराम हेगडे, अन्नामलाई अरापुल्ली गौंदर, आणि व्ही कंडासामी यांचा समावेश आहे. गोपालकृष्ण सीताराम हेगडे यांना 4 लाख रुपये, अन्नामलाई गौंदर यांना 2 लाख 20 हजार 355 रुपये आणि व्ही कंडासामी यांना 2 .1 लाख रुपये पगार आहे. रिझर्व्ह बँकेने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत याबाबतची माहिती वेबसाईटवर अपलोड केली आहे. हा तपशील जून-जुलै 2015 चा आहे. त्यामुळे राजन यांच्यापेक्षा जास्त पगार घेणारे अधिकारी आता रिझर्व्ह बँकेत आहेत की नाही याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.