नवी दिल्ली: नव्या संसदेच्या बांधकामासाठी सेन्ट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतर्गत खासदारांच्या कार्यालयांच्या बांधकामासाठी दिल्लीतील श्रम शक्ती भवन आणि परिवहन भवन या दोन इमारती पाडण्यात येणार आहेत. या ठिकाणी बांधण्यात येणारे खासदारांचं कार्यालयं ही संसदेला भूयाराच्या मार्गाने जोडण्यात येणार आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या नव्या संसदेच्या इमारतीचे भूमीपूजन करण्यात आलं आहे. संसदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचे सर्व नियोजन करण्यात आलं असून त्यामध्ये सुरुवातीला श्रम शक्ती भवन आणि परिवहन भवन या दोन इमारती नियोजनबध्दरित्या पाडण्यात येणार आहेत. या महत्वकांक्षी योजनेचा मास्टर प्लॅन बनवणाऱ्या एचसीपी डिजाइन, प्लानिंग अॅन्ड मॅनेजमेंट प्रायव्हेट लि. च्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की श्रम शक्ती भवन आणि परिवहन भवन या ठिकाणी खासदारांचं कार्यालय बनवण्यात येणार आहे.


संसदेच्या या नव्या इमारतीत लोकसभा सदस्यांसाठी 888 आणि राज्यसभा सदस्यांसाठी 384 बैठकव्यवस्था तयार करण्यात येणार आहेत. संयुक्त बैठकीसाठी 1224 सदस्यांची बसण्याची व्यवस्था देखील असेल. याशिवाय प्रत्येक सदस्यासाठी 400 स्क्वेअर फूटचे स्वतंत्र कार्यालयही या नवीन इमारतीत असेल. नवीन बांधकाम पूर्ण होईपर्यंत विविध मंत्रालयाचे स्थानांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने गोल मार्केट, केजी मार्केट, आफ्रिका अॅव्हेन्यू या ठिकाणांची आणि तालकटोरा स्टेडिअमच्या जवळच्या स्थानांची पाहणी केली आहे.


या इमारती पाडण्याचं काम नियोजनबध्दपणे करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध मंत्रालयामध्ये समन्वय साधला जाईल. मंत्रालयाच्या आणि केंद्रीय सचिवालयाच्या इमारतीसाठी शास्त्री भवन, उद्योग भवन, निर्माण भवन, कृषी भवन यासारख्या अनेक इमारती पाडण्यात येणार आहेत.


ऑक्टोबर 2022 पर्यंत नव्या संसद इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचं मोदी सरकारचं ध्येय आहे. जेणेकरुन देशाचा 75वा स्वातंत्र्य दिवसाचं आयोजन या संसद इमारतीमध्ये करण्यात येईल. ही इमारत पुढील 100 वर्षांची गरज लक्षात घेऊन तयार करण्यात येणार आहे.


महत्वाच्या बातम्या: