नवी दिल्ली : तात्काळ तिहेरी तलाकला फौजदारी गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली. पुढच्या आठवड्यात संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक पटलावर सादर होणार आहे.

तात्काळ तिहेरी तलाकवर बंदी घालण्यात आली असून सरकारने सहा महिन्यात कायदा करावा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने ऑगस्ट महिन्यात दिला होता. स्काईप किंवा व्हॉट्सअॅपवर पतीने दिलेला तात्काळ तिहेरी तलाक असंविधानिक असल्याचं कोर्टाने सांगितलं होतं.

तिहेरी तलाक आणि तात्काळ तिहेरी तलाकमध्ये फरक काय?


मुस्लिम महिला (विवाह हक्काचं संरक्षण) विधेयक हे प्रस्तावित बिल सरकारच्या प्राधान्यक्रमावर आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेत काही मंत्र्यांनी हे विधेयक तयार केलं आहे.

तिहेरी तलाक आणि तात्काळ तिहेरी तलाक म्हणजे काय?

तात्काळ तिहेरी तलाक म्हणजे एकाच वेळी तीनदा तलाक (तलाक तलाक तलाक) अशी उच्चारणा. मात्र तिहेरी तलाकमध्ये प्रतीक्षेचा कालावधी येतो. पहिल्यांदा केलेली तलाकची उच्चारणा आणि घटस्फोटाचा अंतिम निर्णय यामध्ये सर्वसामान्यपणे तीन मुस्लीम महिन्यांचा काळ असतो.

तात्काळ तिहेरी तलाक कसा जारी केला जातो?

पती पत्नीला उद्देशून 'तलाक तलाक तलाक' असं म्हणतो. बऱ्याचदा रागाच्या भरात किंवा मद्याच्या अंमलाखाली, फोनवर, लेखी तलाकनामा, मेसेज किंवा व्हॉट्सअॅपवर हे बोललं जातं.