नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं राहुल गांधींच्या हाती आल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या पक्षात नेमकी काय भूमिका बजावणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं. याच प्रश्नाचं उत्तर खुद्द सोनिया गांधी यांनी दिलं आहे.


राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर सोनिया यांना आता तुमची काय भूमिका असेल? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर सोनिया गांधींनी मिश्किलपणे (हसत-हसत) ‘मी निवृत्त होणार आहे.’ असं वक्तव्य केलं. असं असलं तरीही त्यांनी आपल्या निवृत्तीची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा मात्र सुरु झाली आहे.

दरम्यान, सोनिया गांधी राजकारणातून निवृत्त होणार नसल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. ‘सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्ष पदावरुन पायउतार होणार आहेत. राजकारणातून निवृत्त नाही.’ असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहं.

गेले काही दिवस प्रकृतीमुळे सोनिया गांधी या राजकारणापासून बऱ्याच दूर होत्या. अशावेळी राहुल गांधींच्या हातात पक्षाची सारी सूत्रं सोपवण्यात यावीत अशी मागणी पक्षात जोर धरु लागली होती. त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूकही पार पडली. ज्यात राहुल गांधी बिनविरोध निवडून आले. ते उद्या (शुक्रवार) अध्यक्षपदाचा कार्यभार संभाळणार आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आला होता. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या 900 सदस्यांनी राहुल गांधींचे जवळपास 90 अर्ज दाखल केले होते. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी बिनविरोध निवड होणार हे जवळपास निश्चित होतं.

गांधी घराण्यातील सहावे आणि काँग्रसचे 18 वे अध्यक्ष

दरम्यान, राहुल गांधी हे काँग्रेसचे 18 वे अध्यक्ष ठरले आहेत. तर गांधी घराण्यातील सहावे व्यक्ती आहेत.

याआधी मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु एकदा, इंदिरा गांधी दोन वेळा, राजीव गांधी एक वेळा, सोनिया गांधी एक वेळा काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.

सोनिया गांधी सलग 19 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

अखेर राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड!

गेल्या 39 वर्षांपैकी 32 वर्ष काँग्रेसवर नेहरु-गांधी घराण्याचं राज्य 

‘घराणेशाही हीच काँग्रेसची परंपरा’, विरोधकांची जोरदार टीका 

राहुल गांधींवरुन पूनावाला बंधूंमध्ये वाद, तहसीन यांनी नातं तोडलं