कोलकात्यात पोलीस-सीबीआय आमने-सामने, सीबीआयचे सहा अधिकारी पोलिसांच्या ताब्यात
सीबीआय नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावर काम करत आहे. मोदी जे सांगत आहेत, तेच सीबीआय करत आहे. मी खुप अपमान सहन केला. सीबीआय जे करत आहेत ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या सांगण्यावरुन करत आहे, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जींनी केला.
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यातील वाद पुन्हा समोर आला आहे. रोझ व्हॅली आणि शारदा चिटफंड घोटाळ्यावरुन सीबीआयने कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकला.
मात्र पश्चिम बंगाल पोलिसांनी छापा मारणाऱ्या सीबीआयच्या सहा अधिकाऱ्यांनाच अटक करुन पोलीस स्टेशनमध्ये नेलं. या सर्व प्रकारानं कोलकात्यात सध्या एकप्रकारचा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही कारवाई पंतप्रधान मोदी यांच्या इशाऱ्यावरुन केली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र आणि अमित शाह आपल्याला त्रास देत असून, अजित डोभाल यांच्या इशाऱ्यावर ही कारवाई सुरु असल्याचा दावा ममता बॅनर्जींनी केला आहे. विना वॉरंट पोलीस आयुक्तांच्या घरी छापा टाकण्याची सीबीआयची हिम्मत कशी झाली? असा सवालही ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे.
या कारवाई विरोधात आपण कोलकात्यातील मेट्रो सिनेमासमोर आंदोलन करणार असल्याचंही ममता बॅनर्जींनी यावेळी सांगितलं. "देशात सध्या आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगाल दौऱ्यानंतर सीबीआयच्या हालचालींना वेग आला आहे. ज्यावेळी तृणमूल काँग्रेसचं सरकार पश्चिम बंगालमध्ये आलं त्याचवेळी या प्रकरणातील आरोपींना अटक झाली होती", याची आठवणही ममता बॅनर्जींनी करुन दिली.
सीबीआय नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावर काम करत आहे. मोदी जे सांगत आहेत, तेच सीबीआय करत आहे. मी खुप अपमान सहन केला. सीबीआय जे करत आहेत ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या सांगण्यावरुन करत आहे, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जींनी केला.
काय आहे शारदा चिटफंड घोटाळा ?
शारदा चिटफंड घोटाळा जवळपास 3 हजार कोटीं तर रोझ व्हॅली 15 हजार कोटींचा घोटाळा असल्याचं बोललं जात आहे. एप्रिल 2013मध्ये शारदा घोटाळा समोर आला होता. शारदा ग्रुपच्या कंपन्यांनी चुकीच्या पद्धतीने गुंतवणूकदारांकडून पैसे जमा केले होते आणि ते परत केलेच नाहीत.
गुतवणूकदारांनी पैशाची मागणी सुरु केल्यानंतर हा घोटाळा उघड झाला. घोटाळा उघड झाल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारवरही प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं होतं. शारदा ग्रुपने जवळपास 10 लाख गुतवणूकदारांना फसवल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांना फसवण्यात आलं.