नवी दिल्ली : आयएएस अधिकारी अनुराग तिवारी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये आयएएस अधिकारी अनुराग तिवारी यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. 17 मे रोजी लखनौमध्ये अनुराग तिवारी यांचा मृतदेह सापडला होता.
अनुराग तिवारींच्या कुटुंबियांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
लखनौमध्ये योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर अनुराग तिवारी यांचे भाऊ मयंक तिवारी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनुराग तिवारी यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचं आश्वासन दिले आहे.
मयंक तिवारी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सांगितले होते की, स्थानिक पोलिसांच्या चौकशीवर विश्वास नाही. शिवाय, हे प्रकरण दोन राज्यांमधील असल्याने चौकशी सीबीआयकडे सोपवण्याची मागणीही मयंक यांनी केली होती.
लखनौमधील मीराबाई मार्गावरील शासकीय विश्रामगृहात थांबलेल्या आयएएस अधिकारी अनुराग तिवारी यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता.