नवी दिल्ली : देशाच्या सर्वात मोठ्या तपास यंत्रणेपैकी एक सीबीआयच्या अंतर्गत वादाच्या दरम्यानच मोठी घडामोड घडली आहे. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर अस्थाना यांच्यासह सीबीआयचे मुख्य संचालक आलोक वर्मा यांनाही सुट्टीवर पाठवण्यात आलं आहे. एम. नागेश्वर राव यांची तातडीने प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत एम. नागेश्वर राव?
नागेश्वर राव 1984 सालच्या बॅचचे ओदिशा केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यानंतर ते सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते सीबीआयमध्ये कार्यरत आहेत. अधीक्षक पदावरही त्यांनी काम केलेलं आहे.
नागेश्वर राव यांची 2015 मध्ये चेन्नईत संयुक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बदली झाल्यानंतर ते दिल्लीत आले. सीबीआयमध्ये येण्यापूर्वी ते ओदिशामध्ये अग्निशमन विभागाचे अतिरिक्त संचालक होते. त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणूनही काम केलं आहे. शिवाय काही काळासाठी त्यांनी सीआरपीएफमध्येही सेवा दिली आहे.
नागेश्वर राव हे मूळ तेलंगणामधील वारंगल जिल्ह्यातील आहेत. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रात पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि आयआयटी मद्रासमध्ये संशोधन पूर्ण केलं. मला नेहमीच आव्हानात्मक कामं करायला आवडतं, जे की आपण टाळतो, असं ते सीबीआयमध्ये रुजू होण्यापूर्वी एका वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले होते.
सीबीआय मुख्यालयातील अस्थाना आणि वर्मा यांचे कार्यालय सील
राजधानी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयातील दहावा आणि अकरावा मजला सील करण्यात आला आहे. या मजल्यावर विशेष संचालक राकेश अस्थाना आणि संचालक आलोक वर्मा यांचं कार्यालय आहे. सीबीआयच्या मुख्यालयात येण्यासाठी सर्वांना मनाई करण्यात आली असून मोठ्या अधिकाऱ्यांनाही बाहेरच थांबवण्यात आलं आहे.
अस्थाना यांच्यावर नेमका आरोप काय?
हैदराबादमधील उद्योगपती सतीश बाबू सना यांच्या तक्रारीवरुन सीबीआयने आपल्या संस्थेतील दुसऱ्या क्रमांकाच्या अधिकाऱ्यावर लाच घेतल्याचा ठपका ठेवला आहे. अस्थाना यांना गेल्या वर्षी जवळपास तीन कोटी रुपये दिल्याचा दावा एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. सना यांचा हा दावा सीआरपीसी कलम 164 नुसार न्यायदंडाधिकाऱ्यासमोर नोंदवण्यात आला, जो कोर्टालाही मान्य असेल.
मोईन कुरेशीकडून 50 लाख रुपये घेतल्याप्रकरणी सना हे देखील चौकशीच्या घेऱ्यात होते. या प्रकरणाच्या एसआयटीचं नेतृत्त्व अस्थाना यांच्याकडे होतं. सीबीआयचे विशेष संचालक आणि 1984 च्या बॅचचे गुजरात केडरचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी अस्थाना मांस व्यापारी कुरेशीविरोधात सुरु असलेल्या प्रकरणाचा तपास करत आहेत. कुरेशीवर मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचारासह अनेक आरोप आहेत.
अस्थाना यांचं स्पष्टीकरण
अस्थाना यांनी सीव्हीसी म्हणजेच केंद्रीय सतर्कता आयोगाला पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे. सीबीआयच्या संचालकांनी अजय बस्सी नावाच्या एका अशा अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नियुक्ती केलीय, ज्याला नियम तोडण्यासाठी ओळखळं जातं. आपल्याला फसवण्यासाठी हा आरोप करण्यात आलाय, असं पत्रात त्यांनी म्हटलं आहे.
अस्थाना यांच्याकडे अनेक हायप्रोफाईल प्रकरणांची चौकशी आहे. ज्यामध्ये ऑगस्टा वेस्टलँड चॉपर घोटाळा आणि उद्योगपती विजय मल्ल्या कर्ज प्रकरणाचाही समावेश आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सीबीआयच्या दोन्ही संचालकांची सुट्टी, नव्या प्रभारी बॉसची नियुक्ती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Oct 2018 10:22 AM (IST)
देशातील मोठी आणि विश्वासार्ह अशी ओळख असलेली तपास यंत्रणा सीबीआय सध्या एका वेगळ्याच संकटातून जात आहे. या वादात आता विशेष संचालक आणि मुख्य संचालकांना रजेवर पाठवण्यात आलं आहे. एम. नागेश्वर राव यांना प्रभारी संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलंय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -