नवी दिल्ली: माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या मालमत्तांवर सीबीआयने छापेमारी केली. लालूंच्या दिल्ली, रांची, पुरी, पाटणा, गुरग्राम यासह 12 ठिकाणांच्या मालमत्तांवर सीबीआयनं धाडी टाकल्या.

लालूप्रसाद यादव हे 2006 मध्ये रेल्वेमंत्री असताना त्यांनी पदाचा गैरवापर करुन रांची आणि पुरीमधल्या हॉटेल्सला टेंडर दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी लालूप्रसाद, त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलांसह अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत सीबीआयने पत्रकार परिषद घेऊन या धाडसत्राची माहिती दिली.

कोणा-कोणावर गुन्हा?

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणात लालू यादवांसह त्यांची पत्नी राबडी देवी, मुलगा आणि बिहारचा विद्यमान मंत्री तेजस्वी यादव, लालूंचा निकटवर्तीय प्रेमचंद गुप्तांची पत्नी सरला गुप्ता, विजय कोचर, विनय कोचर- पाटण्यातील सुजाता हॉटेलचे दोन्ही डायरेक्टर, डिलाईट मार्केटिंग कंपनी, आयआरसीटीसीचे माजी एमडीसह अनेकांवर सीबीआयने 5 जुलैला गुन्हा दाखल केला होता.

सीबीआयने या सर्वांवर कलम 420, 120B,13 1D अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टेंडर वाटपात घोटाळा

सीबीआयच्या माहितीनुसार, "जेव्हा लालू यादव रेल्वेमंत्री होते तेव्हा रेल्वेचे हॉटेल बीएनआर-पुरी आणि बीएनआर रांची ही दोन्ही हॉटेल्स आयआरसीटीसीला हस्तांतरित करण्यात आली होती. यांच्या देखभालीसाठी टेंडर मागवण्यात आली होती. याच टेंडर वाटपात घोटाळा झाल्याचं उघड झालं होतं. हे टेंडर सुजाता हॉटेल्सला देण्यात आलं होतं".

लालूंमुळे खासगी कंपनीला फायदा

प्राथमिक चौकशीत टेंडर वाटपात घोटाळा झाल्याचं  समोर आलं. त्याचा फायदा खासगी कंपन्यांना झाला. या खासगी कंपन्यांनी त्याबदल्यात लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबाला एक जमीन दिली. पहिल्यांदा ही जमीन मिसिज डिलाईट मार्केटिंग कंपनीने घेतली, ज्याचा कर्ता-धर्ता सुजाता गुप्ता आहे, अशी माहिती सीबीआयने दिली.

जेव्हा लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री नव्हते, तेव्हापासून 2010 ते 2017 दरम्यान ही जमीन त्यांच्या कुटुंबाला लारा प्रोजेक्टने हस्तांतरीत केली.

या सर्वप्रकारात गडबड-घोटाळा आढळला, त्यामुळेच सीबीआयने आज 12 ठिकाणी छापेमारी केली.