ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळा ज्या आरटीआय कार्यकर्त्याने उघडकीस आणला, त्या आशिष चतुर्वेदी यांनाच सीबीआय कोर्टाने तुरुंगात डांबलं आहे. आशिष चतुर्वेदी यांना सीबीआय कोर्टाने 15 दिवसांचा तुरुंगवास सुनावला आहे. गुरुवारी पोलिसांनी आशिष चतुर्वेदींना सीबीआयच्या कोर्टात बोलावले होते. त्यावेळी न्यायाधीशांनी आशिष यांना 200 रुपये जातमुचलका भरण्यास सांगितलं, मात्र आशिष यांनी नकार दिल्याने त्यांना तुरुंगात जावं लागलं.

आशिष चतुर्वेदी यांनी राहुल यादवच्या प्रकरणात साक्ष देण्यासाठी नकार दिला होता. या प्रकरणात जवळपास 29 लोकांनी साक्ष दिली असून, आणखी काही जणांच्या साक्षी बाकी आहेत. आशिष यांचं मत असं होतं की, आधी इतर लोकांच्या साक्षी पूर्ण होऊ द्याव्यात, नंतर माझी साक्ष घ्यावी.

कोर्टाने आशिष्ट चतुर्वेदी यांच्याविरोधात दोनवेळा अटक वॉरंट जारी केले होते.

त्यानंतर, पोलिसांनी आशिष यांना गुरुवारी कोर्टात हजर केलं होतं. न्यायाधीशांनी आशिष यांना 200 रुपयांचा जातमुचलका भरण्यास सांगितला. मात्र आशिष यांनी तो भरण्यास नकार दिला. त्यानंतर मग आशिष यांना कोर्टाने 15 दिवसांचा तुरुंगवास सुनावला.

आशिष चतुर्वेदी यांच्या तक्रारीनंतरच व्यापम घोटळा उघडकीस आला होता.

व्यापम घोटाळा काय आहे?

मध्य प्रदेशातील सर्वात मोठ्या व्यापम भरती घोटाळ्याशी संबंधित 40 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या सर्व गोष्टींवरुन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर टीकाही सुरु आहे. व्यापमच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या आणि मेडिकल कॉलेजमधील प्रवेशात मोठा घोटाळा झाला होता.

55 खटले, 2,530 आरोपी आणि 1,980 अटक... या सर्व गोष्टींमुळे हा घोटाळा अत्यंत गंभीर मानला जातो. 7 जुलै 2013 रोजी हा घोटाळा उघ़कीस आला. इंदौरमध्ये पीएमटीच्या प्रवेश परीक्षेत काही विद्यार्थी बनावट नावाने परीक्षा देण्यास बसले होते.

मध्य प्रदेश पोलिसांनी या घोटाळ्याचा मास्टरमाईंड डॉ. जगदीश सागर याला अटक केली आहे.