नवी दिल्ली : वाहनधारक आणि वाहन चालकांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. यापुढे तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स खिशात बाळगण्याची गरज पडणार नाही. डिजीटल लायसन्ससाठी रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.


तुमच्या मोबाइलमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी पुरेशी असेल. तपासणी करण्यासाठी मूळ कागदपत्रं घेऊ नका असा आदेश केंद्राने राज्यांमधील वाहतूक विभाग आणि ट्राफिक पोलिसांना दिला आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स पेपरसारख्या कागदपत्रांची मूळ प्रत तपासणीसाठी घेतली जाणार नाही. डिजीलॉकर किंवा एम-परिवहन अॅपमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी दाखवली तरी चालणार आहे.

वाहतूक पोलीस आपल्याकडील मोबाइलवरुन क्यूआर कोड स्कॅन करत चालक किंवा वाहनाची संपूर्ण माहिती डेटाबेसवरुन मिळवू शकतात. त्यासाठी मूळ कागदपत्रं जप्त करण्याची किंवा घेण्याची गरज नाही.