नवी दिल्ली : रोटोमॅक घोटाळ्याप्रकरणी रोटोमॅक पेन्स कंपनीचे मालक विक्रम कोठारी आणि त्यांचा मुलगा राहुल कोठारी याला अटक करण्यात आली आहे. सीबीआयने ही कारवाई केली असून त्यांची सध्या त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, या कंपनीने करचोरी केल्याचेही समोर येत आहे. या प्रकरणी आयकर खात्याकडून 14 बँक खाती गोठविण्यात आली आहेत. यातील बहुतांश खाती उत्तर प्रदेशातील विविध बँक शाखांतील आहेत. कानपूरस्थित उद्योग समूहाने 3 हजार 695 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केल्याचे नुकतेच उघडकीस आलं आहे.

या प्रकरणी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. तसंच बँक ऑफ बडोदाच्या काही अधिकाऱ्यांवरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे

काय आहे प्रकरण?

रोटोमॅकचा मालक विक्रम कोठारीने विविध सात बँकांकडून कर्ज घेतलं होतं, मात्र ते परत केलं नाही. याच प्रकरणी सीबीआयने त्याला अटक केली आहे.

कर्ज घेतलेल्या बँकांमध्ये बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांचा सहभाग आहे.

कोठारी कानपूरमधील रोटोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मालक आणि संचालकीय व्यवस्थापक आहे. सीबीआयने अनेक बनावट कागदपत्रही जप्त केले आहेत, ज्यातून हा घोटाळा कधीपासून करण्यात आला, ते समोर आलं आहे.

कानपूरचं कोठारीचं माल रोड येथील कार्यालय गेल्या आठवड्यात बंद अवस्थेत आढळून आलं होतं. बँक ऑफ बडोदाकडून मिळालेल्या तक्रारीनंतर सीबीआयने कानपूरमधील कोठारीच्या तीन ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती.

रविवारी रात्री कोठारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑप बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाकडून कोट्यवधीचं कर्ज घेतल्याचं समोर आलं होतं.

विक्रम कोठारी कोण आहे?

विक्रम कोठारी पान परागशीही संबंधित आहे. मनसुख भाई कोठारी यांचं निधन झाल्यानंतर त्यांची दोन मुलं दीपक कोठारी आणि विक्रम कोठारी यांनी उद्योग वाटून घेतले. विक्रम कोठारीकडे पेन बनवणारी कंपनी रोटोमॅक आली. अभिनेता सलमान खानला रोटोमॅकचा ब्रँड अॅम्बेसिडर बनवण्यात आलं होतं. एक काळ असा होता की, प्रत्येकाच्या खिशात रोटोमॅक पेन असायचा.

संबंधित बातम्या :

रोटोमॅक कर्ज घोटाळा 800 नव्हे, 3695 कोटींचा, सीबीआयची माहिती


रोटोमॅकचा 800 कोटींचा कर्ज घोटाळा, सीबीआयची छापेमारी सुरु

पाच सरकारी बँकांना रोटोमॅक कंपनीच्या मालकाकडून 500 कोटीचा चुना