कानपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचा एका कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी संताप झाल्याचं पाहायला मिळालं. फित कापण्यासाठी आयोजकांनी कात्रीची व्यवस्था न केल्यामुळे जोशींचा पारा चढला. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हा प्रकार घडला.


भाजपचे खासदार असलेल्या मुरली मनोहर जोशी यांना कानपूरमधील जिल्हाधिकारी कार्यालयात सोलर लाईटचं उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. उद्घाटनासाठी जोशी बराच वेळ लाल फितीसमोर उभे राहिले. पण फीत कापण्यासाठी  कात्री आणण्यात आयोजकांना विलंब झाला.

आयोजकांनी एकाला कात्री आणण्यासाठी पिटाळलं. तोपर्यंत मुरली मनोहर जोशी यांनी गांधीजींच्या पुतळ्याचं पूजन केलं. तरीही कात्री आणायला गेलेली व्यक्ती आली नाही. अखेर जोशींना राग अनावर झाला आणि त्यांनी हातानेच लाल फीत खेचली.

हा प्रकार घडल्यानंतर कात्री घेऊन एक जण अवतरला. त्याला पाहून जोशी संतापलेच. 'आता आणून काय उपयोग, मी केलं आहे उद्घाटन' असं मुरली मनोहर जोशी म्हणाले. आयोजकांनी ती फीत पुन्हा चिकटवली आणि त्यांना कापण्याची विनंती केली. यावर, फित मी आधीच कापली आहे, यालाच तुम्ही उद्घाटन समजा, असं जोशींनी आयोजकांना सुनावलं.

पाहा व्हिडिओ :