मुंबई : देशातील सर्व पोस्ट ऑफिसमधील कामकाज आज (गुरुवार) दुपारी 1.30 वाजल्यापासून ठप्प झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व पोस्ट कार्यालयांना एकमेकांशी जोडणाऱ्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने कामकाज ठप्प झालं आहे.
पोस्टासाठी वापरण्यात येणाऱ्या मेन सर्व्हरमध्ये आज दुपारपासून बिघाड झाला. त्यामुळे तेव्हापासून देशभरातील सर्व पोस्ट ऑफिस बंद आहेत. यामुळे नागरिकांनाही बराच त्रास सहन करावा लागत आहे.
सर्व्हरची ही समस्या नेमकी कधी दुरुस्त होऊ शकेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे पोस्ट ऑफिस कधीपर्यंत बंद राहतील याबाबतही कोणतीच माहिती समजू शकलेली नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्यातील रजिस्ट्रार कार्यालयातील सर्व्हरमध्येही बिघाड झाला होता. त्यावेळी राज्यभरातील सह निबंधक कार्यालयेही तीन दिवस बंद होती. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. तसेच अनेकांना मालमत्तांचे व्यवहारही करता आले नव्हते.