नवी दिल्ली : चांद्रयान-2 नंतर 'कार्टोसॅट-3' या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. 'पीएसएलव्ही सी-47' या प्रक्षेपकाद्वारे 'कार्टोसॅट-3' अवकाशात झेपावल आहे. भारतीय अंतराळ संस्थेकडून (इस्त्रो) बुधवारी (27 नोव्हेंबर) सकाळी पृथ्वी निरीक्षणासाठी कार्टोसॅट हा उपग्रह अवकाशात पाठविण्यात आला आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातील प्रक्षेपण तळावरून हे उड्डाण करण्यात आले.


'कार्टोसॅट-३' भारताचा डोळा असल्याचं म्हटलं जात आहे. कार्टोसॅट-3 हे पृथ्वीची छायाचित्रं घेणं आणि नकाशे निर्मितीसाठी उपयोगी ठरणार आहे. या उपग्रहाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात मॅपिंग करणं शक्य होणार आहे. याचा उपयोग नगर नियोजन, पायाभूत सुविधा विकास, किनारपट्टी विकासात होणार आहे. या उपग्रहाचे वजन 1625 किलोग्रॅम असून, याचा उपयोग मोठ्या प्रमाणात शहरी नियोजन, ग्रामीण संसाधनांचा विकास, तटवर्ती क्षेत्रातील सुरक्षितता यासाठी होणार आहे. . ग्रामीण भागातील मूलभूत सोयीसुविधांचं व्यवस्थापन करणं यामुळे सुकर होणार आहे.

कार्टोसॅट 3 चे आयुष्य पाच वर्षांचे आहे. चांद्रयान 2 नंतर पहिल्यांदाच श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपकाचे उड्डाण झाले आहे. कार्टोसॅट-3 उपग्रहासह अमेरिकेतील 13 व्यावसायिक लघु उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. 509 किमीच्या कक्षेत तो पाठवण्यात येणार असून पीएसएलव्ही सी 47 प्रक्षेपकाचे हे 21 वे उड्डाण आहे. पीएसएलव्ही सी 47 आणखी 13 व्यावसायिक नॅनो उपग्रह घेऊन झेपावले आहेत. ते सर्व अमेरिकेचे आहेत. श्रीहरिकोटा येथून होणारे हे 74 वे उड्डाण आहे.