ब्रेडमध्ये कॅन्सरजन्य घटक प्रकरणी ब्रेड असोसिएशनचं उत्तर
एबीपी माझा वेब टीम | 24 May 2016 04:56 AM (IST)
नवी दिल्ली : ब्रेड आणि पावामध्ये कॅन्सरजन्य घटक असल्याचा अहवाल समोर आल्यानंतर दिल्लीतील आघाडीच्या सर्वच ब्रेड उत्पादन कंपन्या संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या. मात्र भारतीय अन्न नियामक मंडळाने घातलेल्या नियमांनुसारच ब्रेडचं उत्पादन होत असल्याचा दावा केला जात आहे. 'एफएसएसएआयच्या नियमावलीनुसार पोटॅशिअम ब्रोमेट आणि/किंवा पोटॅशिअम आयोडेट यांचं प्रमाण बेकरीत ब्रेड बनवण्यासाठी जास्तीत जास्त 50 पीपीएम आणि मैद्यासाठी जास्तीत जास्त 20 पीपीएम असावं.' असं ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मागो यांनी सांगितलं. यूएसएमध्ये वापरले जाणारे आणि सुरक्षित मानले गेलेले अॅडिटिव्ह्ज भारतात ब्रेडमध्ये वापरत असल्याचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला आहे. ब्रेड, पाव, बन पाव, पिझ्झा ब्रेड, बर्गर ब्रेड अशा सर्व घटकांमध्ये कॅन्सरजन्य केमिकल असल्याचा दावा सेंटर फॉर सायन्सने केला आहे. त्यासाठी संस्थेने दिल्लीतील विविध बेकरी आणि फास्ट फूड आऊटलेटमधील नमुने तपासले. धक्कादायक म्हणजे त्यापैकी 75 टक्के टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. सीएसईने दिल्लीमध्ये 38 प्रकारचे ब्रेड तपासले, त्यातल्या 84 टक्के ब्रेडमध्ये ब्रोमेट आणि आयोडेट अधिक प्रमाणात होतं. केमिकलमुळे या रोगांना निमंत्रण - या दोन्ही केमिकल्सच्या सेवनाने मूत्रपिंडाचे विकार होऊ शकतात. - थायरॉईडसारख्या आजाराला आपण निमंत्रण देऊ शकतो. - इतकंच नाही, तर केमिकलच्या अति सेवनाने कॅन्सरही होऊ शकतो. परदेशात बंदी मात्र भारतात सर्रास वापर अन्न प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी झटणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेने 1989 साली ब्रोमेट हे घातक असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे 1990 पासून कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन, श्रीलंका, ब्राझील, नायजेरिया, पेरु, कोलंबिया अशा देशांमध्ये ही दोन्ही केमिकलवर बंदी आहे. पण आपल्या देशात अन्न प्रक्रियेला नियंत्रित करणारा कुचकामी कायदा हा आपल्याच जीवावर उठला आहे.