श्रीनगरमध्ये पोलीस स्टेशनवर दहशतवादी हल्ला, दोन पोलीस शहीद
एबीपी माझा वेब टीम | 24 May 2016 01:52 AM (IST)
श्रीनगर: श्रीनगरमधल्या गजबजलेल्या जादीबल परिसरातल्या पोलीस स्टेशनवर काल दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यावेळी त्यांनी केलेल्या गोळीबारात दोन पोलीस शहीद झाले. हल्ल्यानंतर हे दहशतवादी पळून गेले. शहीद झालेल्यांमध्ये एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि हवालदाराचा समावेश आहे. नजीर अहमद आणि बशीर अहमद अशी शहीद झालेल्या पोलिसांची नावं आहेत. या दोघांवरही अगदी जवळून गोळी झाडण्यात आल्यानं हे दोघेही जागेवरच गतप्राण झाले. दरम्यान, श्रीनगरमध्ये दुसरीकडे सरायबाला भागात पोलीस आणि दहशतवाद्यांच्यात चकमक झाली. यात दोन अतिरेकी ठार झाले आहेत ज्यात जैश ए मोहम्मद या आतंकवादी संघटनेचा कमांडर सैफुल्लाह ठार झाल्याचं कळतं आहे आणि एका अतिरेक्याला जिवंत पकडण्यात आलं आहे. श्रीनगरमध्ये काल पोलिस ठाण्यांवर केलेल्या हल्ल्यात यांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पोलीस स्टेशन्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांची शोध मोहीम चालू होती. त्याचदरम्यान सरायबाला भागात ही चकमक झाली.