भोपाळ: मध्य प्रदेशात लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी आहेत.
सिंगरौली जिल्ह्यातून हा ट्रक काल रात्री लग्नासाठी सीधीच्या दिशेने जात होता, त्यावेळी ही भीषण दुर्घटना झाली.
हा ट्रक 60 ते 70 फूट खोल नदीपात्रात कोसळला. त्यामुळे अनेकजण जागीच मृत्युमुखी पडले. तर काहीजण गंभीर जखमी झाले.
जखमींना नजीकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
या दुर्घटनेप्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच मृतांच्या नातेवाईकांना दोन-दोन लाख, तर जखमींना 50-50 हजार रुपयांची मदत जाहीर केली.
मृतांची संख्या वाढण्याची भीती
दरम्यान, या अपघातात अनेक जण गंभीर जखमी असल्याने, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. सध्या मिनी ट्रक नदीपात्रातून बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. त्यासाठी क्रेन बोलावण्यात आली आहे.
अपघातग्रस्त मिनी ट्रक पुलाच्या भिंतीला धडकून, सुमारे 60 ते 70 फूट नदीपात्रात कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.