जम्मू-काश्मीर सरकारमध्ये लवकरच फेरबदल, भाजपच्या सर्व 9 मंत्र्यांचे राजीनामे
एबीपी माझा वेब टीम | 17 Apr 2018 09:41 PM (IST)
जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या सर्व 9 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. मेहबुबा मुफ्ती मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल करण्यात येणार असून यावेळी भाजपच्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचं समजतं आहे.
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या सर्व 9 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. मेहबुबा मुफ्ती मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल करण्यात येणार असून यावेळी भाजपच्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचं समजतं आहे. भाजपच्या सर्व मंत्र्यांनी जम्मू-काश्मीरचे भाजप प्रदेश अध्यक्ष सत शर्मा यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या पीडीपी आणि भाजप युतीचं सरकार आहे. मेहबुबा मुफ्ती या तेथील मुख्यमंत्री आहेत. मेहबुबा मुफ्ती या माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या आहेत. तसंच त्या जम्मू-काश्मीर पीपल डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षही आहेत. विधानसभा निवडणुकीत जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीने सर्वाधिक 28 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने तिथे 25 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर काँग्रेसला तिथं फक्त 12 जागांवर विजय मिळवता आला होता. येथील त्रिशंकू अवस्थेनंतर पीडीपीने भाजपच्या साथीने सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपच्या 9 मंत्र्यांना संधी देण्यात आली होती. मात्र, आता फेरबदलाआधी नऊही भाजप मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.