श्रीहरिकोटा : भारताची अतंराळ संशोधन संस्था इस्रोची महत्वाकांक्षी 'चांद्रयान-2' ही मोहीम तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. लॉन्चिंगच्या काही तास आधी चांद्रयान-2 मोहीम स्थगित करण्यात आली आहे. तांत्रिक कारणामुळे हा निर्णय घेतला असल्याचं इस्रोने जाहीर केलं आहे.

Continues below advertisement


आता चांद्रयान-2 चंद्राकडे कधी झेपावणार याची नवीन तारीख लवकरच इस्रोकडून जाहीर केली जाणार आहे. 15 जुलैच्या मध्यरात्री 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान चंद्राकडे झेपावणार होतं. मात्र लाँचिंग काऊंटडाऊनच्या जवळपास 56 मिनिट आधीच मोहीत स्थगित करण्यात आली. भारतच नव्हे तर अवघ्या जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागलं होतं. मात्र तांत्रिक अडचणींमुळे मोहीम तात्पुरती रद्द करण्यात आली आहे.





"लॉन्चिंगच्या जवळपास एक तास आधी व्हेहिकल सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. सावधगिरीचा उपाय म्हणून आम्ही चांद्रयान-2 चं लॉन्चिंग थांबवण्याचा निर्णय घेतला. लॉन्चिंगची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल", असं इस्रोनं म्हटलं आहे.


दहा दिवसांनंतर ठरणार नवी तारीख?

चांद्रयान- 2 मध्ये क्रायोजेनिक इंधन भरताना तांत्रिक बिघाड लक्षात आल्याने काऊंटडाऊन थांबवण्यात आलं. आता इंधन टँकमधून सगळं इंधन काढलं जाईल आणि त्यानंतर पुन्हा तपासणी केली जाणार आहे. यासाठी जवळपास 10 दिवसांचा वेळ लागू शकतो. त्यानंतर लॉन्चिंगची पुढील तारीख ठरवली जाणार आहे.

भारत अशा प्रकारची मोहीम राबवणारा पहिलाच देश ठरणार आहे. या मोहिमेसाठी भारताला तब्बल 978 कोटी रुपये खर्च आला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या यानाचे सर्व भाग स्वदेशी आहेत. या मोहिमेत चंद्रावर असलेल्या पाण्याची पातळी, चंद्रावरील जमीन, त्यावर उपलब्ध असलेली खनिजं, रसायनं आणि त्यांचा अभ्यास केला जाणार आहे.


चांद्रयान2 मोहिमेची वैशिष्ट्य काय?




  • चांद्रयान तब्बल 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतर पार करुन चंद्रावर पोहोचणार

  • चंद्रावर पोहोचण्यासाठी चांद्रयान दोनला 55 दिवसांचा कालावधी लागणार

  • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोवर प्रज्ञान उतरेल

  • चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान चंद्रावरची माहिती कंट्रोल सेंटरला पाठणार


चांद्रयान2 मोहिमेतील अडचणी आणि आव्हान




  • अंतराळात चंद्राच्या गतीबरोबरच चांद्रयान दोनच्या गतीवर नियंत्रण ठेवणे

  • चांद्रयान दोन पृथ्वीपासून 3 लाख किमींच्या अंतरावर असल्यानं त्याच्याशी संपर्क कायम ठेवणे

  • चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर रोवर आणि लँडर विक्रम उतरवणे

  • चंद्रावरच्या तापमानासह धुळीचाही मोहिमेवर परिणाम होऊ शकतो




संबंधित बातम्या