Budget 2021 App येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच 1 फेब्रुवारी 2021 ला देशाचा वार्षिक अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. त्यापूर्वीपासूनच अर्थसंकल्पाबाबतच्या बऱ्याच चर्चा सध्या पाहायला मिळत आहेत. शिवाय याबाबतची उत्सुकताही काही कमी नाही. याच वातावरणात निर्मला सीतारमण यांनी शनिवारी (Union Budget Mobile App) युनियन बजेट मोबाईल अॅप लाँच केलं. ज्यानंतर भारतानं पेपरलेस अर्थसंकल्पाच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे.


देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पाची छापिल प्रत उपलब्ध नसणार आहे. ज्या पार्श्वभूमीवर हे अॅप तयार करण्यात आलं असून, त्या माध्यमातून सर्वसामान्य जनता आणि नेतेमंडळींना अर्थसंकल्पाची सॉफ्ट कॉपी सहजपणे पाहता येणार आहे.


फक्त अर्थसंकल्पच नव्हे, तर आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालाचीही छापिल प्रत उपलब्ध नसून, त्याचीही सॉफ्ट कॉपीच संसदेतील सदस्यांना पाहता येणार आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरुपात 29 जानेवारीला संसदेत हा अहवाल सादर केला जाणार आहे.


Union Budget Mobile Appची काही वैशिष्ट्य


- Union Budget Mobile App हे अॅप इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये लाँच करण्यात आलं आहे. अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्रकारचे मोबाईल वापरणाऱ्यांसाठी हे अॅप उपलब्ध असेल.
- या अॅपमध्ये अर्थसंकल्पाच्या 14 डॉक्युमेंट आहेत. यामध्ये डिमांड फॉर ग्रँट, आर्थिक विधेयक आणि इतरही मुद्द्यांसंबंधीची माहिती देण्यात आली आहे.
- या अॅपमध्ये डाउनलोडिंग, प्रिंटिग, सर्च, झूम इन आणि आउट, एक्सटर्नल लिंक असे फिचर्सही देण्यात आले आहेत. शिवाय हे अॅप अतिशय युजर फ्रेंडली आहे.
- 1 फेब्रुवारी 2021ला संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकप्लाचं पूर्ण भाषण केल्यानंतर त्याच्या डॉक्युमेंट या अॅपवर उपलब्ध होणार आहेत.





अॅप कसं कराल डाऊनलोड?


प्लेस्टोअरच्या माध्यमातून हे अॅप डाऊनलोड करता येणार आहे. त्याशिवाय केंद्रीय अर्थसंकल्पाचं संकेतस्थळ www.indiabudget.gov.in इथूनही हे अॅप डाऊनलोड करता येणार आहे.