नवी दिल्ली: अडीच महिन्याच्या काळानंतर पुन्हा एकदा LAC वरचा तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीन या दोन देशांदरम्यान रविवारी चर्चा होणार आहे. ही चर्चा चीनच्या हद्दीतील माल्डो या भागात होणार असून भारताकडून लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन याचे नेतृत्व करणार आहेत. लडाखच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या दोन देशांदरम्यान ही नववी बैठक आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून भारत आणि चीन दरम्यान लडाखच्या सीमेवर तणाव सुरु आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात भारतीय हद्दीतील लडाखच्या सीमेत चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केली होती. त्यावर दोन्ही देशात संर्घष पेटला आहे. हा वाद चर्चेच्या माध्यमातून मिटावा अशी भारताने भूमिका घेतली आहे. आतापर्यंत या दोन देशात आठ बैठका झाल्या आहेत तरी कोणताही ठाम निष्कर्ष निघाला नाही. या दोन देशांमध्ये 6 नोव्हेंबर रोजी शेवटची बैठक झाली होती.
India China Border Dispute: चिनी सैनिकाचा भारतीय हद्दीत प्रवेश; भारतीय लष्कराने घेतलं ताब्यात
भारतीय लष्करातर्फे लेहमधील 14 व्या कोअर (फायर अॅन्ड फ्यूरी) चे कमांडर, लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन या चर्चेसाठी नेतृत्व करतील तर चीनकडून पीएलए सेनेचे दक्षिण डिस्ट्रिक्ट कमांडर नेतृत्व करणार आहेत. ही चर्चा चीनच्या हद्दीतील मोल्डो बीपीएम हट या ठिकाणी होणार आहे. दोन्ही देशांनी आपापले सैनिक LAC च्या मागे घ्यावेत आणि या परिसरातील सैनिकांची संख्या कमी करावी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी असतील असं सांगण्यात येतंय.
आठव्या बैठकीनंतरही तणाव कमी न झाल्याने या दोन देशादरम्यानच्या कोअर कमांडर स्तरावरील बैठक जवळपास बंद करण्यात आली होती. दोन्ही देशांदरम्यानचा हा तणाव कमी व्हावा यासाठी राजकीय पातळीवर चर्चा करण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा कोअर कमांडर स्तरावरील बैठक होणार आहे. चीनच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
चीनच्या कुरापती सुरुच; नियंत्रण रेषेवर तळ ठोकल्याची दृश्य समोर
मे 2020 मध्ये लडाखच्या सीमेवर चीनी सैन्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या दोन देशांच्या लष्करादरम्यान तणाव निर्माण झाला. गलवानच्या खोऱ्यात दोन्ही लष्करात हिंसक झडप होऊन त्यात भारताचे 20 सैनिक शहिद झाले होते. चीनचेही मोठे नुकसान झाले होते. त्याचसोबत हॉट स्प्रिंग, गोगरा आणि फिंगर एरिया मध्येही चीनी सैनिकानी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. यावरुनही दोन्ही सैनिकांत झडप झाली होती. या निमित्ताने गेल्या 45 वर्षात पहिल्यांदाच या दोन देशांच्या सीमेवर गोळीबाराची घटना घडली होती.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांनी आधीच स्पष्ट केलंय की चर्चेच्या माध्यमातून हा मुद्दा सुटला तर ठिक आहे, अन्यथा भारतीय लष्कर कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास सज्ज आहे.
India-China Standoff | LAC वर कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार: लष्कर प्रमुख