Buddha Purnima 2023 : आज बुद्ध पौर्णिमा म्हणजेच बुद्ध जयंती. बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण आणि उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस गौतम बुद्धांची जयंती आणि त्यांचा निर्वाण दिवस देखील आहे. भगवान बुद्धांना या दिवशी ज्ञानप्राप्ती झाली. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे 180 देशांतील बौद्ध लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. यातील अनेक देशांत बुद्ध पौर्णिमेची सार्वजनिक सुट्टी असते.
बुद्ध पौर्णिमेची वेळ
आज बुद्ध पौर्णिमेबरोबरच वर्षातील पहिले चंद्रग्रहणही आहे. द्रिक पंचांग नुसार, पौर्णिमा तिथी 05 मे 2023 रोजी म्हणजेच आज पहाटे 04:14 वाजता सुरू झाली आणि 06 मे 2023 रोजी पहाटे 03:33 वाजता समाप्त होईल.
बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व
वैशाख शुद्ध पौर्णिमेला सिद्धार्थ अर्थात गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले. म्हणून ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमेच्या रुपाने साजरी होते. भगवान बुद्धांनी जगाला एक नवा दृष्टिकोन दिला. त्यांनी लोकांच्या दु:खांची कारणं सांगून त्या दु:खांचं निवारण देखील सांगितलं. बिहारच्या बोधगयामध्ये बोधीवृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते. विशेष म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच कुशीनगरमध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालं. भगवान बुद्धांना भगवान विष्णूचा नववा अवतार देखील मानलं जातं. बुद्ध पौर्णिमा जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दुःखाचे मूळ आणि ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. यासाठी ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्धांनी दिलेले काही उपदेश
आपल्या मोक्षासाठी स्वतःच प्रयत्न करा. इतरांवर अवलंबून राहू नका.
रागाच्या भरात हजार शब्द चुकीचा उच्चारण्यापेक्षा मौन हा एक शब्द जीवनात शांती आणणारा आहे.
तुमच्याकडे जे आहे त्याची अतिशयोक्ती करू नका किंवा इतरांचा मत्सर करू नका.
वाईटाचा वाईटाने कधीच अंत होत नाही. द्वेषाचा अंत फक्त प्रेमानेच होऊ शकतो, हे अटळ सत्य आहे.
जशी मेणबत्ती अग्नीशिवाय जळत नाही, त्याचप्रमाणे मनुष्य आध्यात्मिक जीवनाशिवाय जगू शकत नाही.
रागाला धरून राहणे म्हणजे एखाद्या गरम कोळशाला दुसर्यावर फेकण्यासारखे आहे, तो तुम्हालाच जाळतो.
माणसाची निंदा झाली पाहिजे जेणेकरून चांगुलपणा त्याच्यावर मात करू शकेल.
महत्त्वाच्या बातम्या :