Britain New PM :

  भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार आहेत. 28 ऑक्टोबर रोजी त्यांचा शपथग्रहण सोहळा होणार आहे. ऋषी सुनक 28 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून 29 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकते. 


पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर ऋषी सुनक यांनी ब्रिटनला संबोधित केले. ते म्हणाले, माझ्या संसदीय सहकार्‍यांचा पाठिंबा मिळाल्याने आणि कंझर्व्हेटिव्ह व युनियनिस्ट पक्षाचा नेता म्हणून निवड झाल्याबद्दल मी अत्यंत आनंदी आहे. हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे भाग्य आहे. यासाठी मी संपूर्ण जनतेचा आभारी आहे. ब्रिटन हा एक महान देश आहे, परंतु आपण गहन आर्थिक आव्हानाचा सामना करत आहोत. आता आपल्याला स्थिरता आणि एकात्मता हवी आहे आणि मी माझा पक्ष देशाला एकत्र आणण्यास माझे सर्वोच्च प्राधान्य देईन. कारण हा एकमेव मार्ग आहे, ज्यामुळे आपण आव्हानांवर मात करू शकतो आणि आपल्या मुलांसाठी आणि नातवंडांचे चांगले भविष्य घडवू शकतो. मी शपथ घेतो की मी प्रामाणिकपणे आणि नम्रतेने तुमची सेवा करीन. 






ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नाव मागे घेतल्याने सोमवारी ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतृत्व हाती घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली. युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर सुनक कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले. जिथे त्यांचे इतर सदस्यांनी जोरदार स्वागत केले.  


लिझ ट्रस यांनी अभिनंदन केले


माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी ऋषी सुनक यांना कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि यूकेचे पुढील पंतप्रधान म्हणून नियुक्त केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी ट्विट केले की, "कंझर्वेटिव्ह पक्षाचे नेते आणि आमचे पुढील पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांची नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन. तुम्हाला माझा पूर्ण पाठिंबा आहे."