मुंबई: बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टा तयार झाल्याने निर्माण झालेल्या सितरंग चक्रीवादळाची (Cyclone Sitrang) तीव्रती वाढली आहे. त्यामुळे कोलकाता आणि परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून पश्चिम बंगालमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे चक्रीवादळ ईशान्येकडील राज्यांकडे प्रवास करत असून जस-जसं जमीनीकडे सरकेल, तस-तसं त्याची तीव्रता अजून वाढेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. 


सितरंग चक्रीवादळाचा प्रवास बांग्लादेशातून पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्याकडे सुरू असून या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


 




एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम तैनात 


सितरंग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या भागात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. किनारपट्टीच्या भागातील मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून रोखलं जात आहे. उत्तर आणि दक्षिण 24 परगणा या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे. सितरंग चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका हा या दोन जिल्ह्यांना असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. 


वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात  


सितरंग चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर 90 ते 110 किमी वेगाने वारं वाहत आहे. सितरंग चक्रीवादळ 25 ऑक्टोबरच्या सकाळी बांग्लादेशच्या बोरिशाल जवळील तिनकोना द्वीप आणि सनद्वीप या दरम्यान प्रवास करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वादळाची तीव्रता लक्षात घेता पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या भागात योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सितरंग चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


कोलकात्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व तयारी केली असून सर्व घाटांवरील फेरी सेवा बंद करण्यात आली आहे. किनारपट्टीच्या भागात कंट्रोल रुम सुरू करण्यात आल्या असून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव त्यावर लक्ष ठेऊन आहेत.