Brij Bhushan Sharan Singh Facebook Post : एकीकडे कुस्तीपटूंच्या (wrestlers protest) समर्थनार्थ आयोजित महापंचायतीचा आज दुसरा दिवस आहे तर दुसरीकडे बाजूला बृजभूषण सिंह (brij bhushan singh) यांचा अयोध्येतील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी 5 जून रोजी होणाऱ्या त्यांच्या रॅलीमध्ये 11लाख लोक सहभागी होणार असल्याचा दावा केला होता.
कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे सध्या सर्वोच्च न्यायलयात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून बृजभूषण सिंह यांना कठोर निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे बृजभूषण सिंह यांनी त्यांचे बरेच कार्यक्रम रद्द केल्याचं आता म्हटलं जात आहे. अयोध्येतील रामकथा पार्कमध्ये बृजभूषण सिंह यांच्याकडून जन चेतना महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु सर्वेच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे ही रॅली रद्द करण्यात आल्याचं बृजभूषण सिंह यांनी सांगितलं आहे. बृजभूषण सिंह यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "तुम्हा सर्वांच्या पाठिंब्यामुळे मी गेली 28 वर्ष लोकसभेतील सदस्य म्हणून लोकांची सेवा करत आहे. मी सत्तेमध्ये आणि विरोधात देखील असतो, तसेच मी सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतो. यामुळेच विरोधातील काही राजकीय पक्षांनी माझ्यावर खोटे आरोप लावले आहेत." या फेसबुक पोस्टद्वारे बृजभूषण सिंह यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.
'सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान'
बृजभूषण सिंह यांनी पुढे लिहिताना म्हटले आहे की, "सध्याच्या काळात काही राजकीय पक्ष अनेक ठिकाणी रॅली आणि कार्यक्रमांचे आयोजन करुन प्रांतवाद, क्षेत्रवाद आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करुन सामाजिक एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे 5 जून रोजी अयोध्येमध्ये संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, जेणेकरुन समाजातील वाईट प्रवृत्ती दूर होण्यास मदत होईल. परंतु पोलिसांकडून सध्या या प्रकरणात चौकशी सुरु आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा सन्मान करत जन चेतना महारॅली काही दिवसांकरता स्थगित करण्यात आली आहे."
'तुमचा सदैव ऋणी राहिन'
जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळे बृजभूषण सिंह यांनी जनतेचे देखील आभार मानले आहेत. बृजभूषण सिंह यांनी म्हटलं की, "माझ्यावर केलेल्या आरोपांमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला समर्थन दिले. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो आणि त्यासाठी माझे कुटुंब सदैव तुमचे ऋणी राहिल."