Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या अटकेच्या मागणीविरोधात कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकेत यांनी आज (1 जून) खाप महापंचायत बोलावली आहे. ही महापंचायत उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये आयोजित केली जाणार आहे. त्यात दिल्ली, यूपी, हरियाणा आणि पंजाब, राजस्थानसह देशभरातील विविध खापचे प्रतिनिधी असतील. खाप आणि शेतकरी गटांचे प्रतिनिधी या महापंचायतीमध्ये कुस्तीपटूंच्या सुरु असलेल्या आंदोलनावर चर्चा करतील.


भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते नरेश टिकेत यांनी बुधवारी (31 मे) सांगितलं की, गुरुवारी मुझफ्फरनगरच्या सोराम गावात महापंचायत आयोजित केली जाणार आहे. कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्यावर धमकावल्याचा आणि लैंगिक छळाच्या आरोप केला आहे. त्यांच्याविरोधात सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनावर महापंचायतीमध्ये चर्चा होईल. यात यूपी, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि दिल्लीतील विविध खापांचे प्रतिनिधी महापंचायतीत सहभागी होणार आहेत. सध्या सुरु असलेल्या पैलवानांच्या आंदोलनाबाबत भविष्यातील रणनीती ठरवणं हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे.


50 खाप सहभागी होण्याची अपेक्षा


या महापंचायतीमध्ये किमान 50 खाप सहभागी होण्याची अपेक्षा आहे, असं या महापंचायतीशी संबंधित एका व्यक्तिने सांगितलं. दरम्यान नरेश टिकेत यांच्या टिप्पणीच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी, 30 मे रोजी साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह देशातील अव्वल कुस्तीपटू शेकडो समर्थकांसह हरिद्वारला त्यांची ऑलिम्पिक आणि इतर जागतिक स्पर्धांमधील पदके गंगा नदीत विसर्जित करण्यासाठी पोहोचले होते. मात्र, खाप आणि शेतकरी नेत्यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी पदकांचं विसर्जन केलं नाही. 


'शेतकरी संघटना पाठिंबा देणार'


दिल्लीतील पालम 360 खापचे अध्यक्ष चौधरी सुरेंद्र सोलंकी म्हणाले की, "कुस्तीपटूंनी मंगळवारी (30 मे) त्यांच्या पदकांचे विसर्जन करण्याचा भावनिक निर्णय घेतला आणि त्यांना रोखणं आमचं कर्तव्य होतं." "या आंदोलनाचं नेतृत्व यापुढेही कुस्तीपटूच करतील आणि सर्व खाप तसंच शेतकरी संघटना त्यांना पाठिंबा देतील," असं सोळंकी यांनी सांगितलं. 


आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून दिल्ली पोलिसांच्या वर्तणुकीचा निषेध


दरम्यान, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंविरोधात दिल्ली पोलिसांच्या वर्तणुकीचा तीव्र निषेध केला आहे. हे अत्यंत त्रासदायक आहे, असं समितीने म्हटलं. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (UWW) जंतर-मंतर इथल्या आंदोलनादरम्यान कुस्तीपटूंना ताब्यात घेताना त्यांच्यासोबत दिल्ली पोलिसांनी केलेल्या वर्तणुकीवर टीका झाल्यानंतर IOC ची प्रतिक्रिया समोर आली आहे.


हेही वाचा


UWW on Wrestlers Protest : "..तर पुढच्या 45 दिवसांत भारतीय कुस्तीगीर महासंघ बरखास्त करु"; जागतिक कुस्ती महासंघाचा इशारा, कुस्तीपटूंना मिळालेल्या वागणुकीबाबतही आक्षेप