भारतीय पॅराकमांडोंनी बुधवारी पहाटे पावणे पाच वाजता सर्जिकल स्ट्राईक केला. यामध्ये नॅशनल सोशालिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँड (NSCN) खापलांगच्या दहशतवाद्यांचे तळ नेस्तानाबूत करण्यात आले.
भारत आणि म्यानमारच्या सीमेजवळील लांखू गावाजवळ असलेल्या नागा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. मात्र आंतरराष्ट्रीय सीमा पार न करता हे मिलिट्री ऑपरेशन करण्यात आलं. भारतीय सैन्यातील जवान यामध्ये सुखरुप असल्याची माहिती आहे.
दरम्यान, हा सर्जिकल स्ट्राईक नसून मिलिट्री ऑपरेशन असल्याचं सैन्यातर्फे सांगण्यात येत आहे.
म्यानमारमध्ये भारताने केलेली हे दुसरं सर्जिकल स्ट्राईक आहे. जून 2015 मध्ये एनएससीएन-के च्या दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलं होतं. मणिपूरमध्ये नागा दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झाले होते.
https://twitter.com/easterncomd/status/912958697663381504
https://twitter.com/easterncomd/status/912969068784652288
भारतीय सरकारचा 2001 मध्ये नॅशनल सोशालिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँड (NSCN) खापलांगसोबत करार झाला होता. मात्र 27 मार्च 2015 रोजी एनएससीएनने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत करार मोडला.
पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या वर्षपूर्तीच्या दोन दिवस आधी हा दुसरा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला आहे.
27 सप्टेंबर 2016 ला पाकव्याप्त काश्मिरमध्ये सर्जिकल स्ट्राईक
जम्मू काश्मीरमधील उरी इथं 18 सप्टेंबर रोजी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी 10 डोग्रा रेजिमेंटच्या बटालियन मुख्यालयावर हल्ला केला होता. या उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. भारतीय जवानांनी 27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री दहशतवाद्यांच्या एलओसीवर सात तळांवर हल्ला करुन, 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला
सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?
सर्जिकल स्ट्राईक ही युद्धशास्त्रातील एक संज्ञा आहे. सर्जिकल स्ट्राईकमध्ये निष्णात सर्जन ज्या पद्धतीने शस्त्रक्रिया करताना नेमक्या ठिकाणची शस्त्रक्रिया करतो, त्याचप्रमाणे आपल्याला अपेक्षित असलेल्या ठिकाणी नेमकी तसंच परिणामकारक आणि अचूक शस्त्र कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक.
थोडक्यात सर्जिकल स्ट्राईक म्हणजेच अतिशय नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाईच असते. सोप्या भाषेत घुसून मारणं.
सर्जिकल स्ट्राईकमध्ये मोठं नुकसान टाळण्यावर भर दिला जातो. आपल्याला अपेक्षित ठिकाणावरच नेमका हल्ला करणं म्हणजेच सर्जिकल स्ट्राईक होय.
साधारणपणे विमानांद्वारे करण्यात येणाऱ्या बॉम्बहल्ल्यात आपल्याला अपेक्षित ठिकाणापेक्षा आजूबाजूच्या परिसराचीही मोठी हानी होते