नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचं 'वंदे मातरम्'मधील काही शब्द बदलण्यावर जोर दिला आहे. चार दिवसांपूर्वी इंदूरच्या गांधी हॉलमध्ये आयोजित संसदीय कार्य मंत्रालयाच्या चित्रकला प्रदर्शनात गायिकाने संपूर्ण 'वंदे मातरम्' गायलं. यानंतर सुमित्रा महाजन आपल्या भाषणात म्हणाल्या की, आता सप्त कोटि कंठऐवजी कोटी-कोटी कंठ शब्दाचा वापर करायला हवा. 'जागरण'ने हे वृत्त दिलं आहे.

महाजन यांच्या म्हणण्याचा अर्थ भारताच्या लोकसंख्येबाबत होता. हे गीत लिहिलं त्यावेळी, भारताची लोकसंख्या केवळ सात कोटी होती. यानंतर गायिकेने सुमित्रा महाजन यांची माफी मागत भविष्यात ही गोष्ट लक्षात ठेवेन, असं आश्वासन दिलं.

अनेक कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'वंदे मातरम्' गायलं जातं. यावरुन कायम वादही होत असतात. 1905 मध्ये वाराणसीमध्ये झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात 'वंदे मातरम्' गायलं होतं. काही मुस्लीम संघटनेने यावर आक्षेप नोंदवला होता. आता लोकसभा अध्यक्षांनी 'वंदे मातरम्'मध्ये बदल करण्याकडे लक्ष वेधलं.

संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर त्रुटी
लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यामते, 'ज्यावेळी संपूर्ण 'वंदे मातरम्' गायलं जातं तेव्हा त्यात त्रुटी असतात. आता आपण सप्त कोटिच्या (सात कोटी) पुढे गेलोय. आता कोटी-कोटी झाले आहेत, त्यामुळे गातानाही कोटी-कोटी शब्द बोलायला हवा. ज्या भारत मातेसाठी गात आहोत, तिचं आजची रुपरेखाही पाहण्याची गरज आहे. त्यामुळे 'सप्त कोटि' शब्द समकालीन राहिलेला नाही.'

गीता रचनेच्या वेळी देशाची लोकसंख्या सात कोटी
तर संस्कृत साहित्यकार डॉ. मुरलीधर चांदनीवाला यांनी म्हटलं आहे की 1882 मध्ये प्रकाशित झालेल्या बंकिमचंद्र यांच्या प्रसिद्ध आनंदमठ या कादंबरीत वंदे मातरम् रचना केली होती. गीत लिहिलं तेव्हा देशाची लोकसंख्या सात कोटी होती, यामुळे सप्तकोटि कंठ कल-कल निनाद कराले, (सात कोटी कंठांचा जोशपूर्ण आवाज) द्विसप्त कोटि-भुजै धृत खरकरवाले (14 कोटी भुजांमध्ये तलवारी धारण केलेले) या ओळींमध्ये तेव्हाच्या लोकसंख्येचा उल्लेख केला होता.