Israel Embassy Blast :  दिल्लीतील अतिसुरक्षा क्षेत्रात असलेल्या इस्रायली दूतावासाच्या (Israel Embassy in Delhi) मागे असलेल्या मोकळ्या प्लॉटवर स्फोटाचे आवाज झाल्याने खळबळ उडाली आहे. या ठिकाणावरून काही प्रमाणात धूर दिसून आला होता. त्यामुळे दिल्ली पोलीस आणि इतर तपास यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपास अधिकाऱ्यांना रात्रीच्या सुमारास घटनास्थळावरून इस्रायली राजदूतांना उद्देशून एक पत्र सापडले आहे. 


मंगळवार (26 डिसेंबर) रोजी सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी एक स्फोटासारखा मोठा आवाज झाला. त्यानंतर दिल्ली पोलिसांना सायंकाळी 5.47 वाजता पीसीआर कॉलवर ही माहिती मिळाली. ही बाब इस्रायली दूतावासाची असल्याने जिल्हा पोलीस, स्पेशल सेल, एनआयए, आयबी, रॉ, अग्निशमन अधिकारी, एनएसजी आदींचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.


घटनास्थळावरून पत्र मिळाले 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पत्र इस्त्रायली राजदूतांना उद्देशून लिहिण्यात आहे. पत्रावरील बोटांचे ठसे जाणून घेण्यासाठी फॉरेन्सिक टीमने हे पत्र ताब्यात घेतले आहे. तपास अधिकाऱ्यांनी पत्राचा फोटो काढून ठेवला आहे.   






इस्रायलने काय म्हटले?


भारतातील इस्रायली मिशनचे उपप्रमुख ओहद नकाश कायनार म्हणाले, “आमचे सर्व राजनयिक आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. आमची सुरक्षा टीम दिल्लीच्या स्थानिक सुरक्षा टीमच्या पूर्ण सहकार्याने काम करत आहे आणि ते या प्रकरणाचा पुढील तपास करतील. 


इस्रायल दूतावासाचे प्रवक्ते गाय नीर यांनी सांगितले की, दूतावासाजवळ स्फोट झाल्याची आम्ही पुष्टी करू शकतो. दिल्ली पोलीस आणि सुरक्षा पथक अजूनही तपास करत आहेत.


यापूर्वीही स्फोट झाला होता


यापूर्वीही इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट झाला होता. जानेवारी 2021 मध्ये कमी तीव्रतेचा स्फोट झाला होता. यामध्ये काही कारचे नुकसान झाले होते. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. याआधी, फेब्रुवारी 2012 मध्ये येथील दूतावासात कारखाली बॉम्ब ठेवण्यात आला होता. या हल्ल्यात राजनयिकाची पत्नी जखमी झाली होती.


सुरक्षा कर्मचारी हाय अलर्टवर


पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरू झाल्यापासून दूतावासाच्या आसपास सुरक्षा कर्मचारी हाय अलर्टवर आहेत.