कोकीळ गातो, पोपट बोलते इथपर्यंत आपलं सर्वाचं ज्ञान आहे. पण खोल सागरात विहार करणारा देवमासा (व्हेल) गाणं गातो, हे आता पुराव्यानिशी सिद्ध झालंय.
खरं तर गेली काही वर्ष देवमाशापैंकी निळ्या देवमाशाची प्रजाती अशा पद्धतीनं गायन करते हे त्यांच्या आवाजाच्या रेकॉर्डिंगसह सिद्ध करण्याचे जगभर प्रयत्न सुरु आहेत.
काही ठिकाणी त्याला यशही मिळालं, पण भारताच्या हद्दीत ते ही लक्षद्वीप बेटाजवळ पिग्मी ब्लू देवमाशाचं गायन रेकॉर्ड करण्यात यश आलं. त्यामुळे देवमाशाची ही दुर्मिळ प्रजाती गायन करते हे तर सिद्ध झालंय पण भारतीय समुद्र हद्दीत या दुर्मिळ देवमाशाच्या अस्तित्वावरही शिक्कामोर्तब झालं.
पिग्मी ब्लू व्हेल ही देवमाशाची अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहे, तिचं वास्तव्य हिंद महासागरात असल्याचेही अनेक वर्षांपासूनचे पुरावे आहेत, मात्र ते भारताच्या जवळ असलेल्या समुद्रात आढळल्याचे पुरावे कधीच सापडले नव्हते. आणि म्हणूनच जेव्हा लक्षद्विप बेटावरचे मच्छिमार आम्ही कायम मोठाले देवमासे बघतो असं सांगु लागले तेव्हा दिव्या पानिकर नावाच्या युवा संशोधिकेला खरंच हे अत्यंत दुर्मिळ असे गाणारे देवमासे आहेत का याचा शोध खुणावू लागला.
2015 सालापासून तब्बल सहा वर्ष जिकीरीचं संशोधन केल्यानंतर आज मात्र दिव्याकडे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पिग्मी ब्लू व्हेलच्या गाण्याचं रेकॉर्डिंग आहे, जे त्यांच्या गाण्याचे आणि त्यांच्या अस्तित्वाचे अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वाचे पुरावे ठरतायत.
दिव्याने 2018 साली सी डायवर्सच्या मदतीने कवरत्ती बेटाजवळ खोल समुद्रात मायक्रोफोन लावले. बेटांच्या दोन टोकांना वेगवेगळे मायक्रोफोन लावले गेले. आणि तिच्या आश्चर्याला पारावार उरला नाही जेव्हा तिच्या मायक्रोफोन्समध्ये मान्सूनच्या अगदी थोडं आधी देवमाशाचा आवीज रेकॉर्ड झाला. त्यामुळे ठराविक काळात हे दुर्मिळ देवमासे लक्षद्विप बेटांजवळच्या समुद्रात वास्तव्य करतात हे देखील सिद्ध झालंय.
दिव्या पानिकरच्या या संशोधनामुळे आता लश्रद्विप बेटांवरील आणि समुद्रातील जैवविविधता जपण्याबाबत फार गांभीर्यानं विचार करण्याची गरज निर्माण झालीय, कारण अत्यंत दुर्मिळ असा देवमासा तर तिथे वास्तव्य करत असेल तर त्याचं संवर्धनही महत्त्वाचं आहे..