नागपूर : दलितांप्रती प्रेम दाखवण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन जेवण्याच्या पद्धतीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नाराजी व्यक्त केली आहे. फक्त दलितांच्या घरी जाऊन जेवल्याने काम होणार नाही, असं संघाने म्हटलं आहे.


भाजपच्या काही नेत्यांनी ज्याप्रकारे दलितांच्या घरी जेवण करण्याच्या नावावर स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यावर संघाचे नेते नाराज आहेत. असं करु नका, जे प्रामाणिक आणि खरं वाटेल तेच करा, असा सल्लाही आरएसएसने दिला आहे.

दलितांशी संपर्क साधा : मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या मंत्री, खासदार, मुख्यमंत्र्यांना दलितांच्या घरी जाऊन त्यांच्याशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला दिला होता. यामुळे समाजाता चांगला संदेश जाईल, असा त्यामागील उद्देश होता. पण यानंतर नेत्यांनी एवढी सक्रियता दाखवली की, त्यांचं वागणं वादाचा विषय बनला.

दलिताच्या घरी जेवण आणि वाद
भाजप अध्यक्ष अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथही दलितांच्या घरी जाऊन जेवण करतात. अमित शाह आपल्या राजकीय दौऱ्यात अनेकदा दलित आणि आदिवासींच्या घरात जेवतात. पण उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री सुरेश राणा हे दलिताच्या घरी जाऊन जेवल्याची चर्चा मीडियामध्ये रंगली. कारण ते एका कुटुंबात जेवायला तर गेले, पण तिथे कॅटरर बोलावून स्वयंपाक बनवला आणि मिनरल पाणी मागवलं. यानंतर काँग्रेसने भाजपवर टीकेची संधी सोडली नाही.

वाद सुरु झाल्यानंतर दलितांच्या घरी जेवण्याच्या कार्यक्रम म्हणजे भाजपचा दिखावा असल्याचा आरएसएसने म्हटलं. भाजपने अशाप्रकारचा दिखावा करु नये, असंही संघाने सांगितलं.

भाजपचा दिखावा
"ज्याप्रकारे दलितांच्या घरी जाऊन जेवण्याचा दिखावा सुरु आहे, तो चुकीचा आहे. भाजप भलेही हे सामाजिक रणनीती म्हणून करत आहे, पण हे चुकीचं आहे. भाजपने त्यासाठी मीडियाला बोलावून दिखावा करायला नको. दलित समाजापर्यंत पोहोचण्याचा खरा आणि प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवा. आरएसएस बऱ्याच काळापासून अशाप्रकारचे कार्यक्रम करत आहे," असंही संघातर्फे सांगण्यात आलं.

मोहन भागवत काय म्हणाले?
काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या संघाच्या अंतर्गत बैठकीत संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी समरसता अभियानावर चर्चा केली. ते म्हणाले की, "आपण अष्टमीच्या दिवशी दलित समाजातील मुलींना तर आपल्या घरी बोलावून पूजा करतो. पण आपण आपल्या घरातील मुलींनाही त्यांच्या घरी पाठवतो का? हे समरसता अभियान तेव्हाच यशस्वी होईल, जेव्हा ते दोन्ही बाजूंनी असेल. म्हणजेच दलितांच्या घरी जाऊन जेवण केल्याने काम होणार नाही, त्यांचाही आपल्या घरी स्वागत करावं लागेल."