नोएडा : गाडी नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात रेडिओ चॅनलमध्ये उच्च पदावर कार्यरत असलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. रेडिओ मिर्चीमध्ये एक्झिक्युटिव्ह असलेल्या 28 वर्षीय तान्या खन्नाला नोएडामध्ये अपघात झाला.


उघडं गटार आणि अपुरे पथदिवे यांच्यामुळे तान्याच्या गाडीला अपघात झाल्याचा दावा केला जात आहे.

तान्या बुधवारी मध्यरात्री दीड वाजता वर्ना कारने घरी येत होती. सेक्टर 85 मध्ये असलेल्या चौकात वळताना तिची गाडी आठ फूट रुंद गटारात कोसळली. गाडीचा बम्पर नाल्याच्या तळाशी आपटल्यावर पुढची काच फुटली. त्यानंतर नाल्यातील पाणी तान्याच्या गाडीत शिरायला लागलं.

तान्या कशीबशी मागच्या सीटवर पोहचली, मात्र दरवाजे ऑटोलॉक झाल्यामुळे तिला बाहेर पडता आलं नाही. ऑटोप्सी रिपोर्टनुसार तान्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाला.

तान्या रेडिओ मिर्चीत सेल्स विभागामध्ये ग्रुप मॅनेजर म्हणून कार्यरत होती. गाझियाबादमधील कवी नगर परिसरात राहत होती.

गुरुग्राममधील कार्यालयातून मैत्रिणीच्या घरी जाताना हा अपघात घडला. तान्या मैत्रिणीच्या गाडीमागून तिची गाडी चालवत होती. मात्र अर्ध्या वाटेत दोघींची चुकामुक झाली. मैत्रिण पुढे निघून गेली. तान्या बराच वेळ मागे न आल्यामुळे तिची मैत्रिण परत आली, तेव्हा तान्याची कार अपघातग्रस्त झाल्याचं आणि भोवती गर्दी जमल्याचं तिला दिसलं.