नितीश कुमार त्यांच्या प्रतिमेप्रमाणेच भ्रष्टाचारासमोर झुकले नाहीत. त्यांच्या या निर्णयाचं स्वागत आहे, असं सुशील कुमार मोदी म्हणाले.
भाजप सरकार स्थापन करणार का, या प्रश्नावर सुशील कुमार मोदी यांनी उत्तर दिलं. कोणत्याही आमदाराची मध्यावधीची इच्छा नाही, असं सुशील कुमार मोदी म्हणाले.
दरम्यान बिहार भाजपने विधीमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ही समिती राजकीय समिकरण आणि केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करणार आहे. या समितीमध्ये सुशील कुमार मोदी, प्रेम कुमार आणि बिहारचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांचा समावेश आहे.
नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया
“बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासूनची जी परिस्थिती सुरु आहे, त्यामध्ये काम करणं अशक्य झालं आहे. लालू यादव आणि काँग्रेसशी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली, मात्र काहीही तोडगा निघाला नाही”, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी राजीनाम्यानंतर दिली.
जेडीयूच्या आमदारांच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल (एकूण 243 सदस्य) :
- आरजेडी (लालू) – 80
- जेडीयू (नितीश कुमार) – 71
- काँग्रेस – 27
- भाजप – 53
- सीपीआय – 3
- लोक जनशक्ती पार्टी – 2
- राष्ट्रीय लोक समता पार्टी – 2
- हिंदुस्तानी अवाम मोर्चा – 1
- अपक्ष – 4
काय आहे नेमकं प्रकरण?
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या मालमत्तांवर सीबीआयने छापेमारी केली होती.
या छापेमारीत तेजस्वी यादव यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरत होती.
दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांनी राजदच्या आमदारांची बैठक घेऊन, तेजस्वी यादव पदाचा राजीनामा देणार नाहीत, असं जाहीर केलं. तर तेजस्वी यादव यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना बडतर्फ करण्याचा इशारा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिला होता.
बिहारमध्ये जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेसची युती आहे. या छापेमारीनंतर गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांचं बोलणंही बंद झालं आहे. त्याचा भाग म्हणून बिहारमध्ये झालेल्या एका सरकारी कार्यक्रमाला नितीश कुमारांची हजेरी होती, पण उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दांडी मारली होती.
संबंधित बातम्या :