पाटणा: बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांची भेट घेऊन नितीश कुमार यांनी राजीनामा सुपूर्द केला.


लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर सीबीआयने केलेल्या छापेमारीनंतर, लालू आणि नितीश कुमार यांच्यातील संबंध ताणले होते. त्याचा शेवट आज नितीश कुमार यांच्या राजीनाम्याने झाल्याचं सध्यातरी पाहायला मिळतं.

नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया

“बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासूनची जी परिस्थिती सुरु आहे, त्यामध्ये काम करणं अशक्य झालं आहे.  लालू यादव आणि काँग्रेसशी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली, मात्र काहीही तोडगा निघाला नाही”, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी राजीनाम्यानंतर दिली.

राजकीय भूकंप बिहारमध्ये, हादरे महाराष्ट्रात?

जेडीयूच्या आमदारांच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल (एकूण 243 सदस्य) : 

  • आरजेडी (लालू) – 80

  • जेडीयू (नितीश कुमार) – 71

  • काँग्रेस – 27

  • भाजप – 53

  • सीपीआय – 3

  • लोक जनशक्ती पार्टी – 2

  • राष्ट्रीय लोक समता पार्टी – 2

  • हिंदुस्तानी अवाम मोर्चा – 1

  • अपक्ष – 4


सध्या बिहारमध्ये आरजेडी, जेडीयू आणि काँग्रेसचं सरकार आहे. ज्यांचे एकूण 178 आमदार आहेत. जे बहुमतापेक्षाही 56 अधिक आहेत.

नितीश कुमार यांना सरकार बहुमतात ठेवायचं असेल तर, जुने मित्र पक्ष एनडीएकडे यावं लागेल, ज्यामध्ये त्यांना भाजपचा पाठिंबा मिळेल. नितीश कुमार एनडीएकडे आल्यास आकडा 129 एवढा होतो, जो बहुमतापेक्षा जास्त आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या मालमत्तांवर सीबीआयने छापेमारी केली होती.

या छापेमारीत तेजस्वी यादव यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरत होती.

दुसरीकडे  लालू प्रसाद यादव यांनी राजदच्या आमदारांची बैठक घेऊन, तेजस्वी यादव पदाचा राजीनामा देणार नाहीत, असं जाहीर केलं. तर तेजस्वी यादव यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना बडतर्फ करण्याचा इशारा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिला होता.

बिहारमध्ये जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेसची युती आहे. या छापेमारीनंतर  गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांचं बोलणंही बंद झालं आहे. त्याचा भाग म्हणून बिहारमध्ये झालेल्या एका सरकारी कार्यक्रमाला नितीश कुमारांची हजेरी होती, पण उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दांडी मारली होती.

....म्हणून मी राजीनामा दिला : नितीश कुमार

“मी राज्यपालांना भेटून राजीनामा दिला. गेल्या 20 महिन्यात बिहारमध्ये महायुती सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या. लालू यादव आणि काँग्रेसशी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली, मात्र काहीही तोडगा निघाला नाही.  गेल्या काही दिवसांपासूनची जी परिस्थिती आहे, त्यामध्ये काम करणं अशक्य झालंय. नोटाबंदीचं समर्थन केलं तरीही माझ्यावर आरोप करण्यात आले. आम्ही राजकारण करतच नाही, काहीही मार्ग नाही पाहून स्वतःच राजीनामा दिला”, असं नितीश कुमार म्हणाले.

LIVE UPDATE : नितीश कुमार यांचा राजीनामा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नितीश कुमारांचं अभिनंदन


https://twitter.com/abpmajhatv/status/890205662705143808