पाटणा : नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमध्ये नवी राजकीय गणितं समोर येण्याची चिन्ह आहेत. कारण नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अगदी काही वेळातच भाजपच्या गोटातील हालचाली वेगवान झाल्या आहेत.


सुशील मोदी यांच्या निवासस्थानी बिहारमधील भाजपच्या आमदारांची बैठक सुरु झाली. शिवाय, दिल्लीतही भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होते आहे.

नितीश कुमार यांना एनडीएने पाठिंबा दिल्यास...

जर नितीश कुमार यांनी एनडीएचा पाठिंबा घेण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना सत्ता स्थापन करण्यास कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत. कारण एनडीएकडे सध्या एकूण 57 जागा आहेत. त्यामध्ये भाजपच्या 53, आरएलएसपी आणि एलजेपीच्या प्रत्येकी 2-2 जागा आहेत. तर तिकडे नितीश कुमार यांच्या आरजेडीच्या एकूण 71 जागा आहेत. त्यामुळे एनडीएचा पाठिंबा घेण्यास नितीश कुमार तयार झाल्यास त्यांच्या एकूण जागा 129 होतील आणि ते बहुमताचा आकडा सहजपणे पार करु शकतील.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी नितीश कुमार यांना बाहेरुन पाठिंबा देण्याचं जाहीरपणे म्हटलं होतं.

शिवाय, नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अगदी काही क्षणातच भाजपच्या बैठका सुरु झाल्या. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरवरुन नितीश कुमार यांचं अभिनंदन केलं. या सर्व गोष्टींमुळे एनडीएच्या पाठिंब्याच्या चर्चांना बळ मिळू लागलं आहे.

बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल (एकूण 243 सदस्य) : 

  • आरजेडी – 80

  • जेडीयू – 71

  • काँग्रेस – 27

  • भाजप – 53

  • सीपीआय – 3

  • लोक जनशक्ती पार्टी – 2

  • राष्ट्रीय लोक समता पार्टी – 2

  • हिंदुस्तानी अवाम मोर्चा – 1

  • अपक्ष – 4


आता नितीश कुमार हे एनडीएच्या गोटात जातात का, हे पाहणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे.