BJP MP Saumitra Khan: भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं कौतुक प्रत्येकवेळा करतात.. इतकेच नाही तर त्यांची तुलना देश-विदेशातील दिग्गजांबरोबर केल्याचं अनेकदा पाहायला मिळालं. आता भाजपच्या एका खासदारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना स्वामी विवेकानंद यांच्याशी केली आहे... भाजप खासदार सौमित्र खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना स्वामी विवेकानंद यांच्याशी केली आहे.
भाजप खासदार सौमित्र खान म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी अधुनिक युगाचं स्वामी विवेकानंद आहेत...' सौमित्र खान यांनी मोदींची तुलना स्वामी विवेकानंद यांच्याशी करण्याचं कारणही सांगितलं आहे. ते म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी अर्पण केलेय.. त्यामुळेच त्यांना आधुनिक भारताचे विवेकानंद असं म्हटलं तर वावगं वाटायला नको..' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना विवेकानंद यांच्याशी केल्यानंतर खासदार सौमित्र खान चर्चेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल भाजप खासदार काय म्हणाले?
पश्चिम बंगालच्या बांकुरा येथे भाजप खासदार सौमित्र खान यांनी मोदींची तुलना स्वामी विवेकानंद यांच्याशी केली. ते म्हणाले की, "स्वामी विवेकानंद यांच्या नव्या रुपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म झाला आहे. स्वामी विवेकानंद आपल्यासाठी देवासारखे आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी देशसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केले आहे. मला वाटतेय की, आधुनिक भारताच्या नव्या रुपासाठी पंतप्रधान मोदी आहेत."
कोण आहेत सौमित्र खान?
सौमित्र खान भाजप खासदार आहेत. ते पश्चिम बंगालमधील बिशनपूर येथून निवडून आले आहेत. ते एक वेळा आमदारही राहिले आहेत. सौमित्र खान यांनी पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेय. आता मोदी यांची विवेकानंद यांच्याशी तुलना केल्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले अभिवादन
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे. स्वामी विवेकानंद यांचे जीवन देशभक्ती, अध्यात्म आणि कठोर परिश्रम यासाठी नेहमीच प्रेरणा देते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे. ते ट्वीटमध्ये म्हणतात की, "स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांचे जीवन नेहमीच देशभक्ती, अध्यात्म आणि कठोर परिश्रमांसाठी प्रेरणा देते. त्यांचे महान विचार आणि आदर्श देशवासियांना मार्गदर्शन करत राहतील."