पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. गृहमंत्री अमित शाह यांच्यासह काँग्रेस, टीएमसी, डीएमके आणिर बीजेडीने त्यांच्या नावाला पाठिंबा दिला. यानंतर ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा
करण्यात आली.
ओम बिर्ला यांची कारकीर्द
ओम बिर्ला हे सलग दुसऱ्यांदा कोटामधून खासदारपदी निवडून आले आहेत. 2003, 2008 आणि 2013 मध्ये बिर्ला राजस्थान विधानसभेवर निवडून आले होते. ओम बिर्ला यांनी सलग सहा वर्ष अखिल भारतीय जनता युवा मोर्चाचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद भूषवलं आहे. तर राजस्थान भाजयुमोच्या अध्यक्षपदीही ते सहा वर्ष विराजमान होते.
उपाध्यक्षपदावर कोणाचा अधिकार?
लोकसभेचा उपाध्यक्ष कायमच विरोधी पक्षामधूनच निवडला जातो. ज्यात विरोधीपक्ष परस्पर सहमतीने या पदासाठी नेत्याची निवड करतात. मात्र मागच्या वेळी मोदी सरकारने ही परंपराही बदलली.
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात उपाध्यक्षपद एआयएडीएमकेच्या एम. थंबीदुरई यांच्याकडे होतं. मोदी सरकारबाबत एआयएडीएमकेची भूमिका सौम्य आहे, त्यामुळेच त्यांना हे पद देण्यात आल्याचा आरोप त्यावेळी विरोधकांनी केला होता.
दुसरीकडे, आंध्र प्रदेशात क्लीन स्वीप देणारी वायएसआर काँग्रेसही उपाध्यक्षपदाची तगडी दावेदार मानली जाते. 25 पैकी 22 जागा मिळवत वायएसआर काँग्रेस लोकसभेत तृणमूलच्या जोडीने चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
बिजू जनता दल किंवा वायएसआर काँग्रेसच्या पदरात लोकसभा उपाध्यक्षपद पडल्यास शिवसेना उपेक्षित राहण्याची चिन्हं आहेत.