कोलकाता : स्वतःचे हातपाय कुलूपांनी बांधून कोलकात्यात हुगळी नदीत झोकून देणारे जादूगार चंचल लाहिरी यांचा मृत्यू झाला आहे. जादूगार मँड्रेक या नावाने प्रसिद्ध असलेले लाहिरी जादू करताना रविवारी बेपत्ता झाले होते. मात्र दोन दिवसांच्या शोधानंतर त्यांचा मृतदेह हाती लागला.

हुगळी नदीपात्रात 40 वर्षीय चंचल लाहिरी यांचा प्रशासनाकडून युद्ध पातळीवर शोध घेतला जात होता. मात्र बेपत्ता झाले, त्या ठिकाणाहून एक किलोमीटर अंतरावर त्यांचा निष्प्राण देह सापडला. स्टीलच्या पिंजऱ्यात 30 फूट पाण्याखाली जाऊन त्यांनी हा स्टंट केला, त्यावेळी त्यांचे हात-पाय साखळ्या आणि दोरखंडाने बांधलेले होते.



लाहिरी यांचे कुटुंबीय एका बोटीत उभे राहून त्यांच्या वर येण्याची वाट पाहत होते, तर प्रेक्षकांनी नदीकिनारी गर्दी केली होती. प्रख्यात अमेरिकन कलाकार हॅरी हॉडिनी यांनी केलेला हा स्टंट लाहिरी यशस्वीरित्या पूर्ण करतील, अशी सर्वांना खात्री होती. मात्र ती अयशस्वी ठरली.

'मी स्वतःला मोकळं करु शकलो, तर ती जादू असेल, अन्यथा ती शोकांतिका ठरेल' अशी प्रतिक्रिया त्यांनी हा स्टंट करण्यापूर्वी दिली होती. दुर्दैवाने ही जादू शोकांतिकाच ठरली. भारतीय जादूगारी क्षेत्राचं मोठं नुकसान असल्याची प्रतिक्रिया दिग्गज जादूगारांकडून व्यक्त केली जात आहे.

याच ठिकाणी 21 वर्षांपूर्वी म्हणजे वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी अशाच प्रकारचा स्टंट आपण केल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. 2013 मध्येही लाहिरी यांनी हा स्टंट केला होता, मात्र बघ्यांनी हुल्लडबाजी केली होती. बॉक्सच्या दरवाजातून त्यांना बाहेर पडताना पाहिल्यानंतर बघ्यांनी त्यांना त्रास दिला होता.