नवी दिल्ली : सध्या मोबाईल फोन्सचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासोबतच गेल्या काही वर्षांत देशभरातल्या गर्दी आणि वर्दळीच्या ठिकाणी, रेल्वे प्रवासात मोबाईल चोरी होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. मोबाईल फोन चोरीला गेल्यामुळे आर्थिक नुकसान तर होतंच सोबत त्यामध्ये असलेली महत्त्वाची माहिती देखील जाते. परंतु यावर आता एक प्लान केंद्र सरकारकडून आखण्यात आला आहे. ज्यामुळे हरवलेला मोबाईल फोन सहज सापडणार आहे.

केंद्रीय दुरसंचार विभागानं देशातील सर्व मोबाईल फोन्सचा एक डेटाबेस तयार केला आहे. या डेटाबेसला 'सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी रजिस्टर' असं नाव देण्यात आलं आहे. या डेटाबेसमध्ये देशातील सर्व मोबाईलच्या IMEI क्रमांकाची नोंद करण्यात आली आहे. या क्रमांकाच्या आधारे येत्या काळात एखादा हरवलेला मोबाईल शोधण सोपे होणार आहे. फोनची चोरी झाल्यास पोलिसांना कळवल्यानंतर तात्काळ या डेटाबेसमधून तुमचा मोबाईल फोन ब्लॉक करण्यात येईल. तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा शोधही घेण्यात येईल.

अशा प्रकारे मोबाईल फोन शोधण्याची चाचणी सर्वात प्रथम महाराष्ट्रात घेण्यात आली आहे. या चाचणीला मोठ्या प्रमाणावर यश मिळाल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच आता देशभरात ही सेवा लाँच करण्यात येणार आहे. त्यामुळे आता येत्या काळात चोरीच्या घटनांना आळा बसेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आणखी वाचा :

भविष्यात व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवण्यासाठी 'फिगरप्रिंट' अनिवार्य?