नवी दिल्ली : भाजप नेत्या आणि खासदार मेनका गांधी यांच्यावर पशुवैद्यकीय डॉक्टरांना असभ्य भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. आग्रा येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांनी हा आरोप केला आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मेनका गांधी यांनी असभ्य भाषा वापरली आहे. हा ऑडिओ 21 जूनचा आहे, जेव्हा मेनका गांधींनी स्वत: आग्राच्या पशुवैद्यकीय डॉक्टर एल.एन. गुप्ता यांना फोन केला होता. डॉक्टर गुप्ता यांनी 1 जून रोजी एका श्वानावर शस्त्रक्रिया केली होती, त्यानंतर त्याची प्रकृती खालावली. या प्रकरणामुळे मेनका गांधी संतापल्या असल्याचा आरोप पीडित डॉक्टरांनी केला आहे.
डॉक्टर गुप्तांचा आरोप आहे की त्यानंतर मेनका गांधी यांनी त्यांच्याकडे श्वानाच्या उपचारावर खर्च झालेले 70 हजार रुपये देण्याची मागणी केली. एवढेच नाही तर त्यांनी एकामागून एक धमक्याही दिल्या. क्लिनिक बंद करण्याविषयी त्या बोलल्या. मी 70 हजार देण्यास नकार दिल्यानंतर मेनका गांधींनी त्यांचे कुटुंब आणि व्यवसायपर्यंत पोहचल्या. ऑडिओ खरा आहे की खोटा याची एबीपी न्यूज पुष्टी करत नाही. मात्र, पीडित डॉक्टर एल. एन. गुप्ता यांनी आपल्या फोनमधील ऑडिओ क्लिप ऐकवला.
हे सर्व प्रकरण समोर आल्यानंतर देशभरातील पशुवैद्यकीय डॉक्टरांनी आज काळा दिवस पाळला असून मेनका गांधी यांनी माफी मागण्याची मागणी केलीय. पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडेही पशुवैद्यकीय डॉक्टरांनी मेनका गांधी यांच्याबद्दल तक्रार केली आहे.
मेनका गांधी यांच्यावर हा पहिलाच आरोप नाहीय. काही दिवसांपूर्वी नोएडाचे डॉक्टर विकास यांच्याशी झालेल्या संभाषणाचा ऑडिओही व्हायरल झाला होता. ते संभाषणही श्वानाच्या उपचारांबद्दलच होते. जेव्हा एबीपी न्यूजने मेनका गांधींशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
वास्तविक, ही सर्व प्रकरणे ऑडिओ रेकॉर्डिंगची आहेत. मात्र, लोकांमध्ये असतानाही मेनका यांनी यापूर्वी अपशब्द वापरले आहेत. 28 जुलै 2019 रोजी त्यांनी सुलतानपूरमधील विद्युत विभागातील कर्मचाऱ्यावर जोरदार बरसल्या होत्या. तर 17 फेब्रुवारी 2018 रोजी, मेनका गांधी पिलीभीत येथील सरकारी कर्मचाऱ्यावरही रागवल्या होत्या.