नवी दिल्ली : देशातील कोरोना लसीकरणाबाबत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. प्रियंका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी EM म्हणजेच इव्हेट मॅनेजरच्या भूमिकेत असल्याची टीका केली आहे.
PM नाही EM म्हणजे इव्हेंट मॅनेजर : प्रियांका गांधी
प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्वीट करत म्हटलं की, डेल्टा प्लस व्हेरिएंट देशात दाखल झाला आहे. मात्र देशात आतापर्यंत फक्त 3.6 टक्के नागरिकांचं लसीकरण झालं आहे. पण पंतप्रधान मात्र इव्हेंट मॅनेजरच्या (EM) भूमिकेत दिसत आहेत. स्वत:ची पाठ थोपटून घेण्याच्या दुसऱ्याच दिवशी देशात कोरोना लसीकरणामध्ये तब्बल 40 टक्क्यांची घट झाली आहे.
पुढे प्रियांका गांधी यांनी म्हटलं की, विक्रमी लसीकरणाच्या फॉर्म्युल्याचा प्रचार... मध्य प्रदेश 20 जून – 692 नागरिकांचं लसीकरण. 21 जून – 16 लाख 91 हजार 967 नागरिकांच लसीकरण. 22 जून – 4 हजार 825 नागरिकांना लसीकरण. एक दिवसाच्या इव्हेंटसाठी लस जमा केल्या, लोकांचं लसीकरण केलं आणि पुन्हा पुढच्या दिवशी लसीकरण कमी झालं. डिसेंबरपर्यंत सगळ्यांना लस देण्यासाठी देशात दररोज 80 ते 90 लाख लोकांचं लसीकरण होण्याची आवश्यकता आहे.
केंद्र सरकार पीआर इव्हेंटच्या पुढे जाऊ शकत नाही : राहुल गांधी
राहुल गांधी देखील कोरोना लसीकरणावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कोविड लसीकरणाच्या संदर्भात ‘पीआर इव्हेंट’च्या पुढे केंद्र सरकार पुढे जाऊ शकत नाही. 'कोरोना लसीकरण जोपर्यंत मोठ्या प्रमाणात होत नाही तोपर्यंत आपला देश सुरक्षित नाही. दुर्दैवाने, केंद्र सरकार पीआर इव्हेंटच्या पुढे जाऊ शकत नाहिये, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.