Brij Bhushan Sharan singh Interview: भाजपचे आमदार आणि भारतीय कुस्तीमहासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan sigh) सध्या चांगलेच प्रकाशझोतात आहेत. बृजभूषण यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करत भारतीय कुस्तीपटूंचे (Wrestlers) दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर बृजभूषण सिंह यांनी कुस्तीपटूंना नार्को टेस्टचे (Narco Test) आव्हान दिले आहे. हे आव्हान कुस्तीपटूंनी देखील स्विकारले आहे. कुस्तीपटूही नार्को टेस्ट करण्यास तयार असून, बृजभूषण सिंह आणि कुस्तीपटूंच्या नार्को टेस्टचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष दिल्ली पोलिसांकडे लागून राहिले असून आता दिल्ली पोलीस कधी या सर्वांना नार्को टेस्टसाठी बोलावणार आहे याची सर्वजण वाट पाहत आहेत.
तसेच नार्को टेस्टच्या प्रश्नांवर उत्तर देतानां बृजभूषण यांनी म्हटलं की, "नार्को टेस्टची मागणी मी केलेली नाही, ही मागणी कुस्तीपटूंचीच आहे."
कुस्तीपटूंची नार्को टेस्टला सहमती : बृजभूषण सिंह
भाजपचे आमदार बृजभूषण सिंह यांनी म्हटले की, "ज्या खेळाडूंनी आरोप लावले आहेत, त्यांनी त्यांची नार्को टेस्ट करायला आपल्या सहमतीचं पत्र कपिल सिब्बल यांना पाठवलं आहे." तसेच, मी देखील माझ्या सहमतीचे पत्र कपिल सिब्बल यांना पाठवणार असल्याचं बृजभूषण सिंह यांनी सांगितलं. "कुस्तीपटू ज्या पद्धतीने ही नार्को टेस्ट करु इच्छितात, त्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. मी मागे हटणार नाही.", असं देखील बृजभूषण सिंह म्हणाले आहेत.
बंजरंग पुनियाच्या स्वत: नार्को टेस्टमध्ये सहभागी होण्याच्या प्रश्नावर बोलताना बृजभूषण म्हणाले की, "बंजरंग यांनी सांगावं की, ते कोणाच्या सांगण्यावरुन या आंदोलनात सहभागी झाले आहेत." बृजभूषण सिंह यांनी म्हटलं की, "कुस्तीपटू हे गेल्या चार महिन्यांनपासून आपला जबाब बदलत आहेत, त्यामुळे या खेळाडूंची देखील नार्को टेस्ट झाली पाहिजे."
जंतर-मंतरवर जाणार नाही : बृजभूषण सिंह
बृजभूषण सिंह यांना एबीपी न्यूजच्या मुलाखतीत जंतर-मंतरवर जाण्याबाबत प्रश्न विचारला. तेव्हा बृजभूषण सिंह यांनी म्हटलं की, "मी त्यांना भेटायला जाणार नाही." पुढे बोलताना ते म्हणाले की, "या खेळाडूंनी काहीच शिल्लक ठेवले नाही आहे. तसेच आता हे प्रकरण दिल्ली पोलिसांकडे गेले आहे, त्यामुळे दिल्ली पोलीस आता यामध्ये योग्य तो निर्णय घेईल."
'जे आंदोलन करत आहेत, त्यांचा खेळ आता संपला आहे'
मुलाखतीत बृजभूषण यांनी म्हटलं की, "या आंदोलनामुळे कुस्तीचं नुकसान झालं आहे.' त्याचबरोबर त्यांनी म्हटलं की, 'जे खरे खेळाडू आहेत ते मैदानावर तयारी करत आहेत. जे जंतर-मंतरवर बसले आहेत त्यांचा खेळ आता संपला आहे.' तसेच बृजभूषण यांनी पुढे बोलतांना म्हटले की, 'हे खेळाडू आता खेळणार नाहीत, तर आता पुढे जाऊन हे निवडणूक लढवणार आहेत.'