संबंधित बातम्या भाजपचे एन.बिरेन सिंह मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
एबीपी माझा वेब टीम | 15 Mar 2017 05:20 PM (IST)
इम्फाळ : मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे एन. बिरेन सिंह विराजमान झाले आहेत. राज्यपाल नजमा हेप्तुल्ला यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 21 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले असले, तरी सरकार बनवण्यात यश मिळवलं आहे. मणिपूरमध्ये गेल्या 15 वर्षांपासून इबोबी सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकार सत्तारुढ होतं. पण या शपथविधी सोहळ्यानंतर भाजपने काँग्रेसच्या या गडाला सुरुंग लावला आहे. भाजपने मणिपूरमध्ये पहिल्यांदाच सत्ता स्थापन केली आहे. मणिपूर विधानसभेत एकूण 60 जागा असून, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 28 जागांवर विजय मिळवून नंबर एकचा पक्ष ठरला. तर भाजपने एकूण 21 जागांवरच विजय मिळवला होता. भाजपकडे बहुमतचा आकडा ही नसताना, पक्षा नेत्यांनी आपल्याला एकूण 32 आमदारांचे समर्थन असल्याचा दावा केला आहे. भाजपच्या 21 आमदारांसह नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी)चे चार, नागा पीपल्स फ्रंटचे चार, एलजेपीचा एक आणि इतर दोन आमदरांचे मिळून 32 आमदारांचे समर्थन असल्याचा पक्षाचा दावा आहे. त्यामुळे गोव्यानंतर मणिपूर हे असे राज्य ठरले आहे, जिथे बहुमत नसतानाही भाजपने मणिपूरमध्ये सरकार स्थापन केलं आहे. बिरेन सिंह यांचा अल्प परिचय बिरेन सिंह यांनी 2002 साली राजकारणात प्रवेश केल्यानंतर काही काळातच ते काँग्रेसवासी झाले. काँग्रेसने 2003 मध्ये त्यांच्याकडे दक्षता राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली. यानंतर 2007 मध्ये त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रालयासह, पूर नियंत्रण आणि युवक कल्याण आणि क्रीडा खात्याचाही भार दिला. मात्र, ऑक्टोंबर 2016 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री इबोबी सिंह यांच्याविरोधात बंड करुन आपल्या विधासभा सदस्यासह राज्य प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्यत्वाचा राजीनामा दिला, यानंतर 17 ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांनी भाजपत प्रवेश केला.