कौशांबी (उत्तर प्रदेश) : कौशांबी जिल्ह्यात भारतीय वायुदलाचं ‘चेतक’ हेलिकॉप्टर कोसळलं. इंजिनमधील बिघाडामुळे उड्डाण घेताच काही वेळात अलाहाबाद-कौशांबी सीमेवर ही दुर्घटना घडली. हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट सुखरुप आहेत.
वायुदलाचं चेतक हेलिकॉप्टर बमरौलीहून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच इंजिनमध्ये बिघाड असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तातडीने हेलिकॉप्टरच्या लँडिंगसाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, लँडिंगआधीच क्रॅश होऊन हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं.
हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी कोसळलं, त्या ठिकाणी गॅस सिलेंडरचं गोदाम होतं. या गोदामाच्या भिंतीला हेलिकॉप्टर धडकलं. सुदैवाने हेलिकॉप्टर गोदामात कोसळलं नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
वायुदलाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. वायुदल अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरच्या इंजिनमध्ये बिघाड असल्याचंच सुरुवातीच्या तपासात समोर आले आहे.