नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर देशातील नागरिकांच्या आनंदात मी त्यांच्यासोबत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर देशातील कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचा आदर करतो. तसेच न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो, असं अडवाणी यांनी म्हटलं.
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सर्व न्यायमूर्तींनी एकमताने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिराचं निर्माण करण्याच्या निर्णय दिला, याचा आनंद आहे. राम जन्मभूमीसाठी देशात जे जन आंदोलन झालं, ते स्वांतत्र्याच्या आंदोलनानंतर झालेले सर्वात मोठं जनआंदोलन होतं. मी या आंदोलनाचा भाग होतो, याबद्दल मी देवाचे आभार मानतो, असं लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं.
देशात आणि जगभरात राहणाऱ्या करोडो भारतीयांच्या हृदयात राम जन्मभूमीचं वेगळं स्थान आहे. राम आणि रामायणाचं भारताची संस्कृती आणि सभ्यतेमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर आज पडदा पडला आहे. आता अयोध्या प्रकरणाचा वाद मिटला आहे, त्यामुळे सर्वांनी कटुता विसरुन एकत्र शांततेत राहिलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
अयोध्येमधील बहुचर्चित वादग्रस्त जागेबाबत सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाने या संदर्भात निर्णय देताना अयोध्येतील संपूर्ण वादग्रस्त जागा रामलल्लाला देण्याचा निर्णय घेतला आहे. तर सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येमध्ये पर्यायी पाच एकर जागा देण्याचा देखील निर्णय सुनावला आहे. निर्मोही आखाड्याचा दावा कोर्टाने फेटाळला असून सरकारने तीन महिन्यात मंदिर निर्मिती आणि व्यवस्थापनासाठी ट्रस्ट बनवण्याबाबत देखील आदेश दिले आहेत.
अयोध्या खटल्याच्या निकालावर निर्णय देणाऱ्या खंडपीठामध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह जस्टिस एस. ए. बोबडे, जस्टिस धनंजय. वाय. चंद्रचूड, जस्टिस अशोक भूषण . जस्टिस एस अब्दुल नजीर यांचा समावेश आहे. सुप्रीम कोर्टात 16 ऑक्टोबर 2019 रोजी अयोध्या खटल्यात सुनावणी पूर्ण झाली होती. सहा ऑगस्टपासून सलग 40 दिवस या प्रकरणी सुनावणी सुरु होती.
संबंधित बातम्या
- Ayodhya Verdict | अयोध्या निकालावर भारतीयांच्या भूमिकेचं मोदींकडून कौतुक, राष्ट्र निर्मितीची आपली जबाबदारी वाढली
- ऐतिहासिक निकाल, संपूर्ण वादग्रस्त जागा रामलल्लाला तर सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येमध्ये पर्यायी पाच एकर जागा
- AYODHYA VERDICT | दहा मुद्द्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण निकाल
- ऐतिहासिक अयोध्या प्रकरणाचा निकाल सुनावणाऱ्या 'त्या' पाच न्यायमूर्तींच्या कारकिर्दीचा आढावा
- सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, मात्र अचूक नाही; 5 एकरची भीक नको - ओवेसी