बंगळुरु: एकीकडे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी (Basavraj Bommai) सीमाप्रश्नी वादग्रस्त वक्तव्यं सुरूच ठेवली असताना त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनीही आता त्यांचीच री ओढण्याचं ठरवलं आहे की काय असा प्रश्न पडतोय. त्याचं कारण म्हणजे कर्नाटकच्या आदिवासी कल्याण मंत्र्यांचं ताजं वक्तव्य. आपण कॉपी करुन दहावी पास झालो असून परीक्षांमध्ये चिटिंग करण्यात आपण पीएचडी मिळवली आहे. मी ज्यावेळी जीन्स घालून जायचो त्यावेळी सगळ्या मुली माझ्याकडे पाहायच्या असं कर्नाटकचे मंत्री श्रीरामुलु (Karnataka tribal welfare minister Sriramulu) यांनी म्हटलं आहे.


विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य बेल्लारीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संबोधित करतानाच केलं आहे. विद्यार्थ्यांसमोरच राज्याच्या मंत्र्यांनी स्वत:ची पोलखोल केल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर काय आदर्श ठेवणार असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. श्रीरामुलु यांच्या वक्तव्यानंतर आता सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 


कॉपी करण्यात पीएचडी 


कर्नाटकचे आदिवासी मंत्री श्रीरामुलु (Karnataka tribal welfare minister Sriramulu) यांनी बेल्लारीतील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. त्यावेळी श्रीरामुलु यांनी त्यांच्या शाळेतल्या आठवणी जागवल्या. शाळेत असताना आपण कसे होतो याबद्दल बोलताना श्रीरामुलु म्हणाले की, परीक्षेच्या दरम्यान कॉपी करण्यात आपण माहिर आहोत. शाळेत असताना अभ्यासावरून आपली सर्वांसमोर आब्रू काढली जायची. आपल्याला शाळेत अभ्यासाचं काहीच यायचं नाही. पण मी दहावी पास झाल्यानंतर मात्र सर्व शिक्षकांनी आश्चर्य व्यक्त केलं. परीक्षांमध्ये चिटिंग करण्यामध्ये मी पीएचडी केलीय. 


Karnataka Minister Sriramulu: जीन्स घालून यायचो त्यावेळी मुली माझ्याकडे पाहायच्या 


कर्नाटकचे मंत्री श्रीरामुलु पुढे म्हणाले की, "मी शाळेमध्ये असताना बॅक बेंचर्स होतो. मी ज्यावेळी जीन्स घालून यायचो त्यावेळी सगळ्या मुली माझ्याकडे पाहायच्या. मी सुरुवातीपासून राऊडी आहे, गरीबांच्या न्यायहक्कासाठी मी 14 वेळा तुरुंगात गेलो आहे."


HD Kumaraswamy Viral Video: कुमारस्वामींचा व्हायरल व्हिडीओ आणि माफीनामा 


दोन आठवड्यापूर्वी कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काँग्रेस नेते आणि विधानसभेचे माजी सभापती केआर रमेश यांच्याबद्दल अपशब्द वापरला होता. कुमारस्वामी यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर कुमारस्वामी यांनी घडलेल्या या प्रकराबद्दल माफी मागितली होती. ते म्हणाले की, "काँग्रेस नेते रमेश कुमार यांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलं त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो. माझ्या वक्तव्यामुळे रमेश यांच्या भावना दुखावल्या असतील, मी ते वक्तव्य मागे घेतो आणि त्यांची माफी मागतो."