नवी दिल्ली : देशातील 51 खासदार आणि आमदारांनी महिलांविरोधात गुन्हे केल्याचे समोर आले आहे. या 51 जणांमध्ये 48 आमदार आणि 3 खासदार आहेत. यामध्ये अपहरण आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांचाही समावेश आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मच्या (ADR) अहवालातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.


एडीआरच्या अहवालानुसार, महिलांविरोधात गुन्हे करण्यात भाजपचे नेते सर्वात आघाडीवर आहेत. भाजपच्या 14 नेत्यांवर महिलांविरोधात गुन्हा केल्याचे गंभीर आरोप आहेत. या गुन्हेगार लोकप्रतिनिधींच्या यादीत सात नेत्यांसह शिवसेना पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर सहा नेत्यांसह ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्ष तिसऱ्या स्थानावर आहे.

एडीआरने या अहवालासाठी 4,896 पैकी 4,852 खासदार आणि आमदारांचे प्रतिज्ञापत्रांची छाननी केली. 776 पैकी 774 खासदारांच्या, तर 4,120 पैकी 4,078 आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांचा समावेश आहे. देशातील सर्वच राज्यांमधील नेत्यांच्या प्रतिज्ञापत्रांची छाननी केली गेली. जवळपास 1,581 (33%) खासदार आणि आमदारांविरोधात गुन्हे दाखल आहेत.

महिलांविरोधात गुन्हे करणाऱ्यांना तिकीट देणाऱ्या मोठ्या पक्षांच्या यादीतही भाजप पहिल्या स्थानावर आहे. भाजपने 45 उमेदवारांना तिकिटं दिल्या. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचा बसपा पक्ष 36 गुन्हेगार उमेदवारांना तिकिटं देत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर काँग्रेस 27 गुन्हेगार उमेदवारांना तिकिटं देत तिसऱ्या क्रमांवर आहे. यात लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा अशा तिन्ही निवडणुकांचा समावेश आहे.