मुंबई : तब्बल 40 वर्षांपूर्वी घरातून हरवलेली व्यक्ती एका यूट्यूब व्हिडीओमुळे घरी परतणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भारतात ही घटना घडली आहे. एका फॅशन डिझायनरने या व्यक्तीचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन यूट्यूबवर अपलोड केला होता.


मणिपूरची राजधानी इम्फाळमधून 1978 मध्ये खोमदाराम गंभीर सिंग बेपत्ता झाले होते. बरीच वर्ष शोधूनही खोमदाराम सापडले नाहीत. मात्र मुंबईतील फॅशन डिझायनर फिरोज साकिर यांनी खोमदाराम यांचा गाणं म्हणतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन यूट्यूबवर अपलोड केला आणि खोमदाराम यांचा शोध लागला. त्यामुळे 40 वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबीयांपासून दुरावलेल्या व्यक्तीची घरवापसी होणार आहे.

या व्हिडीओ पाहताच कुटुंवीयांच्या डोळ्यात अश्रु आले. 40 वर्षांनंतर खोमदाराम सापडतील असा विचारही त्यांनी केला नव्हता. तातडीने कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर इंफाळमधून पोलिसांची एक टीम मुंबईला येऊन खोमदाराम यांना त्यांच्या घरी घेऊन जाणार आहे.

खोमदाराम यांचा व्हिडीओ यूट्यूबवर 17 ऑक्टोबर 2017 रोजी अपलोड करण्यात आला होता. मात्र कुटुंबीयांनी हा व्हिडीओ शुक्रवारी पाहिला आणि खोमदाराम यांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.